धावणाऱ्या बसची काच निखळते तेव्हा…!

पिंपरी – बीआरटी बससेवेला “ब्रेकडाऊन’ने ग्रासले असतानाच आता बसच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. बीआरटी मार्गातून धावत असलेल्या बसची समोरील काच निखळून पडल्याचा प्रकार खराळवाडी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस चालकासह प्रवासीही भांबावले.

दापोडी-निगडी बीआरटी मार्ग अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुला झाला. बीआरटी मार्गाचे मोठ्या थाटात उद्‌घाटन करण्यात आले. मात्र बीआरटी मार्ग सुविधेपेक्षा बीआरटी मार्गातील बसचे “ब्रेक डाऊन’, खासगी वाहनांची रहदारी यामुळे चर्चेत आहे. त्यामुळे गतीमान सेवेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाचा त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असला तरी नवनवीन विघ्न त्यांच्या समोर उभे राहत आहे.

पुण्याहून संभाजीनगरच्या दिशेने जाणारी बस (एमएच12, एचबी 1915) खराळवाडी येथे एच. ए. (हिंदुस्थान ऍन्टीबायोटीक्‍स) कंपनी समोर बीआरटी मार्गातून जात असताना अचानकपणे बसची समोरील काच पुर्णपणे निखळली. चालकाने प्रसंग अवधान दाखवत बस थांबवली आणि पुढील अनर्थ टळला. ही बस नेहरुनगर आगाराची असून ती सकाळीच संभाजीनगरवरुन पुणे स्टेशनसाठी गेली होती. तीच बस परत संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झाला. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बीआरटी मार्गात मागून येणाऱ्या इतर बसेसचाही खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.

नेहरुनगर आगारातील बसेसच्या दुरावस्थेबद्दल दैनिक “प्रभात’ने वारंवार आवाज उठवला आहे. मात्र, प्रशासन अद्याप गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचे आजच्या घटनेवरुन समोर आले आहे. अशा प्रकारचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काच निखळून पडण्याच्या या प्रकारामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

पुणे स्टेशनवरुन गाडी घेऊन मी संभाजीनगरला निघालो होतो. मात्र एच. ए. कंपनी जवळील बीआरटी स्थानकाजवळ बस सुरु असताना अचानक बसची समोरील काच गळून पडली. तेव्हा मी लगेच गाडीला ब्रेक लावला आणि गाडी थांबवली. सुदैवाने गाडीचा वेग नियंत्रणात असल्याने कोणाला कुठलीही इजा झाली नाही.
– सुरेश गावडे, चालक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)