धायरी, नऱ्हे, आंबेगाव, नांदेडला नोटीस

– कचरा महापालिका हद्दीत न टाकण्याची तंबी
– कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा
पुणे (प्रतिनिधी) – सिंहगड रस्ता परिसरात महापालिकेच्या हद्दीत रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्या गावांना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने नोटीस बजावल्या आहेत. धायरी, नऱ्हे, आंबेगाव, नांदेड या चार ग्रामपंचायतींना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कचऱ्याचे प्रमाण तब्बल 70 टन असल्याचे समोर आले आहे.
या गावांजवळ ग्रामीण आणि शहरी भाग हा लगतच असल्यामुळे ग्रामीण भागातील सीमेलगतच्या नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवांचा लाभ होतो. मात्र, या गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाची सुविधा नसल्याने या भागामधील नागरिक महापालिकेच्या हद्दीमध्ये दररोज कचरा टाकत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महापालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणे महापालिकेस कठीण झाले आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावली जाते. ग्रामपंचायत हद्दीमध्ये निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज उचलणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असून यामध्ये सातत्य नसल्यामुळे त्याचा सर्व ताण सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयावर येत आहे. या गावाचा सुमारे 60 ते 70 टन कचरा पालिकेच्या हद्दीत टाकला जातो.
…तर फौजदारी खटले : सहाय्यक आयुक्‍त
या गावांचा मोठ्या प्रमाणात कचरा येत असल्याने सहाय्यक महापालिका आयुक्त रवि पवार यांनी धायरी, नऱ्हे, आंबेगाव, नांदेड या चारही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची नुकतीच बैठक घेतली. तसेच या गावांनी कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य ते पाऊल तत्काळ उचलण्याबाबत सूचना केली. ग्रामीण भागातील जे नागरिक शहरी भागामध्ये कचरा टाकून निघून जातात, अशांवर दंडात्मक कार्यवाही करणेबाबत तसेच फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करण्याबाबत या बैठकीमध्ये सांगण्यात आले. कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी पथक नेमण्यात आल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)