धामणगावमध्ये मिळतेय जीवनोपयोगी शिक्षण

फटांगरे यांना राज्य आदर्श पुरस्कार; रचनावादावरही भर
प्रा. डी. के. वैद्य

अकोले – शाळा ही बाग, मुले ही फुले तर शिक्षक हा माळी होय, असा साने गुरुजींचा सुविचार वाचायला नक्कीच आवडेल; पण तो प्रत्यक्षात उतरायला किती कष्ट पडतात. हे समजायलाही गुणी व रत्नपारखी माणूस हवा. हे काम घडते आहे, ते एका ज्ञान मंदिरात घडते आहे. त्याचे खरे शिल्पकार आहेत, ते राज्य आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षक संतोष दत्तात्रय फटांगरे. ज्या शाळेत परसबाग म्हणजे वर्षाला शालेय पोषणाला आवश्‍यक पिकणारा कांदा, कोथिंबीर पिकते.शिवाय शालेय जीवनात बचत सवय लागावी अशी “सोनू -मोनू बचत बॅंक’ व “शिक्षणाची वारी ठरलेला ज्ञान रचनावाद’. हे सारे शिक्षण मिळत आहे ते धामणगाव पाट (ता.अकोले) या गावाच्या वस्ती शाळेतील चित्र.
खरे तर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणारी शेळके वस्तीची शाळा, ही तळ कोकणातील शाळा शोभावी अशी आहे. पाचशे फूट अंतरावर वाहती मुळा नदी. उतारावर शाळा, आजूबाजूला उतारावरची शेती; पण त्याला जोडून श्रीमंत मनाची राहणारी गरीब माणसे व त्यांची गमभन शिकणारी या शाळेची चिमुरडी मुले. हे दृश्‍य खरे डोळ्यात साठवून ठेवावे असेच राहिले. ही शाळा एक स्वर्गीय नंदनवन वाटायला लागते. या शाळेत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले फटांगरे यांनी विविध विद्यार्थी प्रिय उपक्रम राबवले आहेत. फटांगरे मूळचे सारोळे पठार गावचे. त्यांनी आपली शिक्षकी उमेदवारी बीड जिल्ह्यात सुरू केली ती रणजे या गावी. चार वर्षांनी जिल्हा बदलात पती-पत्नी एकत्रिकरणात त्यांनी गोसावी दरा (संगमनेर) येथे चार वर्षे व आता शेळके वस्तीची धुरा गेले 10 वर्षे ते सांभाळीत आहे. पत्नी व पती भिन्न शाळेत आहेत; मात्र त्यांना या शेळके वस्तीत वस्तीशाळा सुरू केलेल्या अनिता रामहरी झालटे यांची आदर्श शाळा वाटचालीला मदत होत आहे.
या शाळेत बचत बॅंक आहे; पण याचे सर्व रेकॉर्ड ठेवतात ते बाळ गोपाळ. तेच रोखपाल. मुलेच व्यवस्थापक. तेच साहेब आणि तेच लेखनिक. चार हजार रुपये हाती ठेवून जमा झालेली रक्कम हीच मुले बॅंकेत कोतूळ येथे जाऊन खात्यावर भरतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला रोप भेट दिले जाते. ते जगण्याचे प्रमाण 50 टक्के आहे, असे फटांगरे सांगतात. बुधवारी दप्तरमुक्त शाळा असत,ेतेव्हा गणिती खेळ, प्रश्नमंजुषा, योगासने व कोडी असे रंजक शिक्षण मिळते. त्यामुळे बुधवारची मुले उत्सुकतेने वाट पाहत असतात. दरवर्षीचा बाळ आनंद मेळावा, लेक वाचवा अभियान,हळदी-कुंकू, रक्तगट तपासणी, महिला दिन असे विविध उपक्रम राबवणाऱ्या फटांगरे यांचा बोलाबाला पुणे येथे पोचला. तेथील “रोटरी क्‍लब’ने या शाळेला दोन लाख रुपयांचे बेड किट दिले.”इन्फोसिस’ने संगणक दिला. आधार फौंडेशनने पाच शालेय दप्तरे व अन्य शैक्षणिक साहित्य दिले.फटांगरे यांनी तंत्रज्ञानयुक्त शाळा बनविली. तिला डिजिटल केले.
फटांगरे सुरुवातीला बारावी उत्तीर्ण होते. त्यानंतर डी. एड्‌ केले. पदवीधर व बी. एड्‌. करताना व हा सर्व व्याप सांभाळताना त्यांनी दिल्ली प्रकाशन संस्थेची मदत घेऊन पाच पुस्तके प्रकाशित केली.शाळा “ए’ श्रेणीत आणली. लोकशाही रुजवणारी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. बोलक्‍या भिंती बनविल्या. शालेय परिसरात घसरगुंडी, पूल अप्स, स्वतंत्र शालेय पोषण आहार, स्वयंपाक खोली तयार केली.

अतिदुर्गम भागात वेगवेगळे प्रयोग

फटांगरे यांनी वर्गात ज्ञानरचनावाद शिकविला. एक वर्ग शिकवायचा व दुसरा त्यात गुंतवून आपला शालेय दिनक्रम राबवायचा हे शाळेचे वैशिष्ट्‌य होय. सर्व शिक्षा अभियानातील ग्रंथालय आणि सर्व काही असणारी शाळा ही अति दुर्गम भागात मोडणारी आहे. अशी शाळा व असे या शाळेचे आदर्श शिक्षक ठरले ते नवल ते काय?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)