धांगवडीकरांची कैफीयत केंद्रीय मंत्रयाकडे

कापुरहोळ- पुणे-सातारा महामार्ग क्र.4 वर मौजे धांगवडी (ता. भोर) गावच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला असून, सदर पुलाचे बांधकाम योग्य ठिकाणी करण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टी भोर तालुका अध्यक्ष गणेश निगडे आणि धांगवडी गावच्या ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक आणि दळणवळण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे कैफीयत मांडली आहे.
भारतीय जनता पार्टी भोर अध्यक्ष गणेश निगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मौजे धांगवडी (ता. भोर) हद्दीतील चालू असलेल्या उड्डाणपूलाचे बांधकाम हे चुकीच्या पध्दतीने असून, ते धांगवडी ग्रामस्थांच्या गैरसोयीचे आहे. या उड्डाणपुलाचा वापर हा ग्रामस्थांना होणार नाही. मुळातच उड्डाणपुलाचे बांधकाम हे धांगवडी गावच्या एस. टी. बस थांबा फाट्यावर होणे गरजेचे आहे; परंतु प्रस्थापित आमदारांनी एनएच4 प्राधिकरणाला दि.15 मे 2008 चुकीचा पत्रव्यवहार करून उड्डाणपूल धांगवडी फाटा सोडून अर्धा किलोमीटर चुकीच्या ठिकाणी करण्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रामध्ये राजगड साखर कारखाना पुलाच्या पूर्वेस दाखविलेला आहे; परंतु राजगड साखर कारखाना हा मौजे निगडे गावच्या हद्दीत असून कारखान्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल एनएचएआय यांनी (804 अधिक 180) या चेनेजमध्ये केलेला आहे, तसेच उड्डाणपूलाबाबत एनएचएआय यांनी ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे विश्‍वासात न घेता, गावात कोणतीही बैठक न घेता गैरसोयीचे पुलाचे काम चालू केलेले आहे. तरी याबाबत मौजे धांगवडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केलेला आहे;परंतु संबंधित यंत्रणांनी त्यांच्या कुठल्याही अर्जाची अथवा तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे दि. 22 ऑगस्ट 2017 रोजी धांगवडी ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते; परंतु कुठल्याही शासकीय यंत्रणेने आंदोलनाची दखल आजपर्यंत घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव धांगवडी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसभेने एकमुखाने असा निर्णय घेतला की जोपर्यत ग्रामस्थांच्या सोयीच्या उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत शासन दखल घेत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प करण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. या उड्डाणपूलाअभावी धांगवडी फाट्यावर लोकांचे हाल होत आहेत, तसेच वारंवार रस्ता ओलांडताना अपघात होऊन शेतकरी आणि जनावरे मृत्यू आहेत, तरी धांगवडी ग्रामस्थांच्या सोयीच्या उड्डाणपुलाचे बांधकाम धांगवडी फाट्यावर करण्यात येऊन ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
हे निवेदन देताना भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरूड, भोर तालुका भाजप अध्यक्ष गणेश निगडे, सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, गोविंद तनपुरे, जगन्नाथ तनपुरे, केशव तनपुरे, माजी उपसरपंच मोहन तनपुरे, रामदास तनपुरे, ग़्रामपंचायत सदस्य अजय तनपुरे, प्रताप तनपुरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)