धर्म काय असतो हे शहीद रास्ते यांनी दाखविले- डॉ. आसबे

नीरा नरसिंहपूर- शहीद वजीर रास्ते यांनी राष्ट्रासाठी प्राणाची आहुती देवून आई, वडीलांना जगात मान मिळवून देत धर्म काय असतो हे दाखवून दिल्याचे गौरवोद्‌गार कामधेनू परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे यांनी काढले.
ओझरे (ता. इंदापूर) येथे कारगील शहीद वजीर रास्ते यांच्या 18 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात डॉ. आसबे बोलत होते. यावेळी वीरमाता बायडाबाई व वीरपिता दत्तात्रेय रास्ते, कॅप्टन लक्ष्मण माने, विरपत्नी सुरेखा जाधव, अभिनेते शिवाजी गुणवरे, एपीआय महेंद्रसिंग निंबाळकर, शरद गायकवाड, डॉ. सिद्धार्थ सरवदे, मोहन खंडागळे, अनिल पाटील, गजेंद्र रास्ते, सोमनाथ रास्ते, नितीन रास्ते, दिलीप रास्ते, कुमार रास्ते आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आसबे म्हणाले, शहीद वजीर रास्तेंचे स्मारक ही देशाची संपत्ती असून ग्रामस्थांबरोबर तालुक्‍याने वीराची भुमी म्हणून गावाची ओळख निर्माण होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनाच शहीद वीरांचे आई, वडील बनण्याचा मान मिळू शकत नाही. परंतू वीरमाता बायडाबाई व वीरपिता दत्तात्रेय रास्ते यांनी आपला महान वीर पुत्र भारत मातेला दिला. त्यांच्या बलीदानाची आठवण स्मरणात राहण्यासाठी ग्रामस्थांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत. शहीदांचे स्मारक हे तरुण पिढीबरोबर सर्वांना प्रेरणास्थान म्हणून नावारुपाला येणे गरजेचे आहे. गावोगावी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या पत्नी, आई, वडिलाबरोबर कुटूंबीयांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यानंतर लोकप्रतिनीधी व समाजसेवकाला द्यावा. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे रोजीचा ध्वज फडकवण्याचा मान वीर सैनिकांच्या कुटूंबीयांना दिला पाहीजे. स्वातंत्र्यासाठी 7 लाख 32 हजार 781 स्वातंत्र्यवीर व देशभक्तांनी बलीदान दिले. त्या शहीदांना सर्वाच्च मानाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ रास्ते यांनी केले. सूत्रसंचालन भरत रास्ते यांनी तर गजेंद्र रास्ते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)