‘धर्मादाय’ शब्द अंमलबजावणीस काही रुग्णालयांकडून टाळाटाळ

पुणे – धर्मादाय रुग्णालयांच्या नावांसमोर “धर्मादाय’ हा शब्द लावणे बंधनकारक असून, त्याची अंमलबजावणी करण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत आहेत. तसेच काही रुग्णालये दारिद्र रेषेखालील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे धर्मादाय विभागाने रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पुण्यात 56 रुग्णालये धर्मादाय आहेत. या रुग्णालयांना महापालिका, राज्य शासनाकडून सवलती मिळालेल्या आहेत. त्या बदल्यात मात्र गरीब रुग्णांना सुविधा देण्यास या रुग्णालयांकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी पात्र रुग्ण सवलतीच्या दरापासून तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहात आहेत. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्मादाय रुग्णालयांची बैठक झाली.
या बैठकीला शहरातील बहुतांश रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मात्र, आठ मोठ्या रुग्णालयांनी पाठ फिरवली. यावेळी सर्व रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी धर्मादाय विभागाचे नियम पाळत असल्याचे सांगितले. रुग्णांना मोफत उपचार मिळतोय का, रुग्णालयाच्या नावात धर्मादाय हा शब्द लावण्यात आला आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जावा, अशा सूचना डॉ. क टारे यांनी यावेळी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)