धर्मादायच्या उपक्रमाला पुण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमेश्‍वर येथे आयुक्‍त डी. एम. देशमुख यांची माहिती

करंजे- राज्याच्या विविध दुष्काळी तसेच ग्रामीण भागात धर्मादाय विभागातर्फे विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे सामाजिक कार्याल विभागातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुणे विभाग धर्मादाय आयुक्‍त डी. एम. देशमुख यांनी आज (रविवारी) सोमेश्‍वर (करंजे) येथे दिली.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी, मोरगाव तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर देशमुख यांनी श्रीक्षेत्र सोमेश्‍वर मंदिराला भेट देवून पाहणी केली, त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष विनोद भांडवलकर, विश्‍वस्त ऍड. गणेश आळंदीकर, सचिव सुनिल भांडवलकर, सोमनाथ भांडवलकर, प्रताप भांडवलकर, दगडूशेठ हलवाई च्या दत्त मंदिराचे विश्‍वस्त बी. एम. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
मंदिर व रुग्णालयांच्या माध्यमातून राज्यामध्ये चारा छावण्या सुरू केल्या असून जेथे चारा छावण्या शक्‍य नाही तेथील गोशाळांना मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येत आहेत. त्या ठिकाणच्या शाळांना धर्मादाय विभागाच्या वतीने विविध संस्थाच्या मदतीने सायकल बॅंक सुरू केली असून त्या शाळेला सायकली दिल्या जातात, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या सायकली परत शाळेकडे जमा करुन नवीन विद्यार्थ्यांना त्या दिल्या जातात, असा एक नवीन उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात सामुदायिक विवाह, धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना दिला जात आहे. त्यामुळे धरणाची खोली वाढत असून शेतातील उत्पन्न देखील वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधे 80 हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यां राज्यभरातील 430 रुग्णालयातून मोफत उपचार केले जातात. पुणे विभागात 56 रुग्णालय असून तेथेही मोफत उपचार केले जातात. 80 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना बिलात 50 टक्के सवलत दिली जाते, असे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)