धर्माचा बाजार (अग्रलेख) 

लोकांच्या श्रद्धेचा आणि भाबडेपणाचा फायदा घेऊन यथेच्छ माया कमावणाऱ्या आणि त्यावरही समाधान न झाल्याने लैंगिक शोषणासारखे गुन्हे करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या भोंदू बाबा-बुवांनी अलीकडे उच्छाद मांडला आहे. आसाराम, रामपाल, राम रहिम यांसारख्या बाबांची एक मोठी यादी आहे. अलीकडेच दिल्लीतील दाती महाराजांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. ही उदाहरणे पाहिली की, आपला समाज ढोंगी बाबांच्या नादी का लागला आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. आज देशातील बहुतांश राजकीय नेते अध्यात्मिक गुरुंच्या आश्रमांना आपल्या आश्रयाखाली घेण्यास उत्सुक आहेत.

देशात अनेक ठिकाणी कथांचे, प्रवचनांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करूनही समाजाला कोणतीच दिशा मिळत नाही. भव्य मंडपात बसून प्रवचन ऐकताना आपल्याला सर्व काही बरोबर वाटते, मात्र मंडप सोडताना आपले आचरण नेहमीसारखे होते. आज बाबा आणि तथाकथित धर्माचाऱ्यांकडून पोकळ आदर्शवाद मांडला जात आहे आणि त्याचा थेट परिणाम समाजावर होत आहे. आता अशा प्रकारच्या ढोंगीबाबांना समाजातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे.

त्यामागचे कारण या बाबा-बुवांच्या शब्दावर विश्‍वास ठेवणारी, त्यांची अनुयायी असणारी भली मोठी जनता. ती आपल्यासाठी “व्होट बॅंक’ ठरू शकते असा राजकारण्यांचा होरा असतो. त्यातून या बाबांच्या बेकायदेशीर कामांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष जाते. आश्रमांचे प्रमुख हे आपल्या शिष्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवतात आणि आश्रमाशी निष्ठा राखण्यास भाग पाडतात. साहजिकच ही मंडळी आश्रमप्रमुखांविरुद्ध एक शब्दही ऐकायला तयार नसतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या बाजारीकरणाच्या काळात अध्यात्माचा बाजार मांडला जात आहे. सुशोभित व्यासपीठावरून मोहमायेचा त्याग करण्याचा उपदेश द्यायचा आणि खासगी जीवनात अय्याशीचे जीवन जगायचे, हे आजच्या काळातील या ढोंगीबाबांचे खरे रुप आहे. आज धर्माच्या आधारे विविध धर्माचार्य आणि मठाधिश हे गडगंज झाले असून संपत्तीचा मुक्तहस्ताने खर्च करत आहेत. प्रत्येकासाठी धर्म हा हमखास उत्पन्न मिळवून देणारे साधन ठरत आहे. आजच्या घडीला काही राजकीय पक्ष देखील या विचारसरणीपासून दूर राहिलेले नाहीत. ते देखील धर्माच्या नावावर मतदारांची दिशाभूल करताना दिसून येतात. अध्यात्मिक गुरुंना धार्मिक भावनेला साद घालून समाजाला आकर्षित करण्याची शैली अनेकांना अवगत असते.

त्याचा राजकीय नेते देखील खुबीने वापर करतात. प्रश्‍न असा की, धार्मिक भावनांशी होणारा हा खेळ किती काळ चालणार आणि या आडून त्यांच्या संशयित घडामोडींकडे कितीदिवस दुर्लक्ष करत राहणार आहोत? धर्माचा बाजार असाच सुरू राहिला तर समाजातील नैतिकता संपण्यास फार काळ राहणार नाही. आज देशभरातील काही आध्यात्मिक आश्रमात आणि मठात विविध प्रकारची निंदनीय कृत्ये केली जात आहेत. विरक्त जीवन जगण्याचा उपदेश करणाऱ्या बाबांच्या मनात वासनेचे अंकुर फुटणे ही आश्‍चर्याची बाब आहे. बाबा आणि साधूसंतच गैरकृत्य करु लागले, तर आपण नव्या पिढीला कोणत्या तोंडाने नितीमत्तेचे धडे देऊ शकू? भगवे वस्र परिधान करून गैरकृत्य करणारी मंडळी कधीही साधू-संत होऊ शकत नाहीत. याकामी आता समाजानेच गैरकृत्य करण्यात आघाडीवर असणाऱ्या बाबांना खड्यासारखे बाहेर काढायला हवे. धर्माचार्यांच्या आश्रमांना आपण महाल म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

आज काही साधुसंतांचे आश्रम, आखाडे, मठ हे घाणेरड्या राजकारणांचे आश्रयस्थान बनत आहेत. मठाधिपती होण्यासाठी ज्यारितीने शक्तीप्रदर्शन केले जाते, ते पाहता समाजाला दिशा दाखवणारा हा गट मूळ मार्गापासून स्वत:च भरकटल्याचे दिसून येत आहे. स्वार्थीपणा, लोभ, हव्यास, कारस्थान आदी मार्गांचा वापर करून आश्रमांवर कब्जा करणे हीच साधू-संतांसाठी गौरवाची बाब ठरत आहे. तसे पाहिले तर प्रामाणिक संत हा प्रेमाच्या मार्गावर चालत असतो. तो द्वेष, घृणा, निंदा याजवळही फिरकत नाही. एका संताचे हृदय कधीही दुर्बल नसते. त्याच्या मनात अविचारांना जागा नसते. आजचे साधू-संत ज्या गतीने राजकारणात प्रवेश करत आहेत, ती बाब समाजाला लाभदायी नाही.

साधूसंत राजकारणात येण्यामागे एकच कारण सांगितले जाते. ते म्हणजे आजचे राजकारण चुकीच्या मार्गाने जात असून धर्माच्या माध्यमातून राजकारणाला दिशा देण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. परंतु वास्तवात धर्मरक्षक जेव्हा राजकारणात येतात तेव्हा ते राजकारणाला कोणतीही दिशा देऊ शकत नाही. उलट स्वत: राजकारणाच्या माध्यमातून भौतिक सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत असतात. या संपूर्ण प्रक्रियेत धर्म हा केवळ घोषणा देण्यापुरता आणि उपदेशापर्यंतच मर्यादित राहिला आहे. साधू-संत आणि त्यांच्या शिष्यांनी भारतीयांची नाडी अचूकपणे हेरली आहे. धर्माच्या नावावर भारतातील भोळ्याभाबड्या जनतेकडून काहीही करून घेता येते, याची खात्री त्यांना पटली आहे.

धर्मासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी अशा मंडळीची असते, हे बुवाबाजी करणाऱ्यांना कळून चुकले आहे. व्यावसायिकता आणि कठिण स्पर्धेच्या काळात आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाखाली वावरत आहे. दुसरीकडे, भारतातील मोठा समुदाय हा अध्यात्म आणि धर्माच्या आधारे मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. धर्माच्या ठेकेदारांनी भारतीयांची द्विधा मनस्थिती चांगल्या पद्धतीने हेरली असून त्याच्या आधारे जनतेला भावनिक आवाहन करून त्यांना लुटण्याचा गोरखधंदा सुरू ठेवला आहे. देशात अनेक ठिकाणी कथांचे, प्रवचनांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करूनही समाजाला कोणतीच दिशा मिळत नाही. भव्य मंडपात बसून प्रवचन ऐकताना आपल्याला सर्व काही बरोबर वाटते, मात्र मंडप सोडताना आपले आचरण नेहमीसारखे होते. तसे पाहिले तर आज बाबा आणि तथाकथित धर्माचाऱ्यांकडून पोकळ आदर्शवाद मांडला जात आहे आणि त्याचा थेट परिणाम समाजावर होत आहे. आता अशा प्रकारच्या ढोंगीबाबांना समाजातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. डोळे बंद करून अशा बाबांवर विश्‍वास ठेवणाऱ्या मंडळींना जागे करण्याची गरज निर्माण झाली आहे. ढोंगी बाबांवर विश्‍वास ठेवण्यापूर्वी सद्‌सद्विवेक बुद्धीने निर्णय घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)