धरणे भरली; मुठा नदीत पुन्हा विसर्ग

file photo

 

पुणे, दि.4 – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारपैकी पानशेत आणि खडकवासला ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यापैकी खडकवासला धरणातून शनिवारी सकाळपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंत 6 हजार 848 क्‍युसेक ने पाणी सोडण्यात येत होते.
जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसाने खडकवासला धरण भरले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग थांबविण्यात आला होता. त्यात पानशेत धरणसुद्धा आता 100 टक्के भरले आहे. या धरणातून सध्या 990 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. टेमघर धरण हे 61.68 टक्के भरले आहे. त्यातून टप्याटप्याने खडकवासला धरणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून खडकवासला धरणातून विसर्ग सुरूवात करण्यात आला. सुरूवातीला 3 हजार, तर सायंकाळपर्यंत 6 हजार 848 क्‍युसेकपर्यंत ते वाढविण्यात आले. वरसगाव धरणही 82.05 टक्के भरले असून त्यात सध्या 10.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला व्यतिरिक्त अन्य कुठल्याही धरणांमधून पाणी सोडण्यात येत नसल्याचे पाटबंधारे खात्याने म्हटले आहे. तर, धरण परिसरात पावसाला सुरूवात झाली असली, तरी हे प्रमाण अजून अल्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)