धरणसाखळीतून पुन्हा विसर्ग

 

पुणे, दि.17 – गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे सर्वच धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सर्वाधिक म्हणजे 18 हजार 491 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग वाढविल्याने मुठा नदीवरील भिडे पूल दुपारी पाण्याखाली गेला होता.

जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून त्यातून गेले काही दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. सध्या घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणाबरोबर वरसगाव धरणातून सुद्धा 8 हजार 635 क्‍युसेक तर पानशेतमधून 3 हजार 908 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने त्यातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत खडकवासला धरणातून 13 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर त्यात वाढ करुन 18 हजार क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

याव्यतिरिक्त मुळशीमधून 10 हजार 160 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चासकमान-9 हजार 380 तर डिंभे-9 हजार 066 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरण-4 हजार 637 तर भाटघर धरणातून 2 हजार 971 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत असल्याने या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ आहेत. सध्या हे धरण 45.70 टक्‍के भरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)