धबधब्याजवळ अतिउत्साह म्हणजे मृत्यूचीच घंटा

ठोसेघर, भांबवलीकडे पर्यटकांचा ओघ : सतर्कतेची गररज

गुरूनाथ जाधव

सातारा, दि. 13 – पावसाळी पर्यटनासाठी कास, ठोसेघरकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. हिरवा शालू पांघरलेली वनराजी आणि फेसाळणारे शुभ्र धबधबे पाहून पर्यटकांच्या अंगातही उत्साह संचारतो. परंतु, अशावेळी अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. गेल्या काही वर्षात ठोसेघर धबधब्यात पर्यटक पडून दुर्घटना झाल्या आहेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अनेकांची हुल्लडबाजी सुरू असते. धबधब्यात, उंच टेकडीवर सेल्फी घेणे अथवा फोटोसेशन, स्टंटबाजी करणे यामुळे दुर्घटनेचा संभव असतो. पर्यटनाच्या उत्साहावर विरजण पडू नये, यासाठी पर्यटकांचा संयम आणि प्रशासनाने आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची गरज आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे पहायला पर्यटक देशभरातून येत असतात. भांबवली वजराईचा धबधबा, ठोसेघर, कोयनेचा नवजा असे अनेक लोकप्रिय धबधबे आहेत. याठिकाणी प्रशासनाने आवर्जुन काही सुचनांचे काटेकोर पालन करा असे फलक लावलेले असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करत उत्साह संचारलले अनेक युवक-युवती हुल्लडबाजी करत असतात. उंचावरून पडणाऱ्या धबधब्यांना आपल्या मोबाईच्या माध्यमातून सेल्फीबध्द करणे हे अभिमानास्पद वाटत आहे. परंतु ते जीवघेणे ठरल्याच्या घटना जिल्ह्यात या आधीही घडल्या आहेत. किल्ले अजिंक्‍यतारा तसेच ठोसेघर, सज्जनगड या ठिकाणी अशा सेल्फीचे बळी गेले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर सेल्फी काढण्यासाठी धाडस करणे जीवावर बेतू शकते. पाण्यातील दगडांवर शेवाळ साचल्याने ते निसरडे असतात. तसेच पाण्याचे प्रवाह वेगवान असतात. त्यामुळे अतिउत्साह दाखवणाऱ्या युवकाच्या मित्रांनी, कुटूंबियांनी व सुरक्षारक्षकांनी संबंधितास रोखणे आवश्‍यक आहे. अविस्मरणीय क्षणांना कॅमऱ्यात जरूर कैद करताना ती आठवण शेवटची बनू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
धबधबा पहायला जाताना पूर्वनियोजन आवश्‍यक आहे. पर्यटनाचे किट, दोरी, मेडिसिन किट, खाण्याचे जिन्नस, बूट, बॅटरी, जर्किन, गमबूट घेणे आहे. पिकनिकची कुटूंबियांना कल्पना देणे आवश्‍यक आहे.

प्रशासनाची जबाबदारी महत्वाची
पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे जथ्थे धबधब्याचा आनंद घेण्याकरता येत असतात. त्याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या टोळ्या निसर्गाला हानी पोहचवणारी कृत्ये करत असतात. तसेच चोरी किंवा अन्य प्रकार घडण्याच्या शक्‍यता दाट असतात. अशा परिसरात पोलीस बंदोबस्त असेल तर अनुचित प्रकार घडणार नाहीत. स्थानिक व वनविभागाच्या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. फक्त तिकिट घेणे इतकेच काम नसून सुरक्षा देखील महत्वाची आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.

व्यसन टाळाच
निसर्गाचा आस्वाद घेत असताना धबधबा प्रवण क्षेत्रामध्ये मद्य पिऊन दंगा करणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येक धबधबा परिसरात अशा पध्दतीने मद्यपीचा वावर दिसतो. यामुळे कुटुंबासमवेत येणाऱ्या पर्यटकांना त्रास होतोच. शिवाय मद्यपीकडून त्याच्या जीवाचे बरेवाईट होण्याचा धोका संभवतो. निसर्गाचा आनंद लुटताना आपण पर्यावरणामध्ये प्रदूषण करणे टाळले पाहिजे. दारू, सिगारेट, गुटखा अशा पदार्थाचे सेवन न करणेच योग्य आहे. धबधबा परिसरामध्ये अशा गोष्टी करून येणाऱ्यांना रोखले पाहिजे. दारू पिऊन बाटल्या धबधब्याच्या परिसरात टाकण्यात येतात, फोडण्यात येतात. त्यामुळे पर्यटकांना याचा त्रास होत असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)