धनगर समाज आरक्षणासाठी 8 सप्टेंबर “डेडलाइन’

…अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरणार : कृति समितीचा इशारा ;

24 ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 10 – राज्य सरकारने 8 सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गामध्ये समावेश करावा. त्याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर राज्यभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर (एसटी) आरक्षण कृती समितीने शुक्रवारी दिला.

महाराष्ट्र राज्य धनगर (एसटी) आरक्षण कृती समितीच्या वतीने पुण्यीाल विधानभवन येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी विभागीय आयुक्तांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार रामदास वडकुते, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, रमेश शेंडगे, मदन देवकाते, परमेश्‍वर कोळेकर, बाळासाहेब करगळ, दादाभाऊ काळे, शशिकांत तरंगे, विलास वाघमोडे, भिमदेव बुरुंगले, शिवाजीराव इजगुडे, गणपतराव देवकाते आदी यावेळी उपस्थित होते.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय न घेतल्यास दि. 24 ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार आहेत. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 8 सप्टेंबर रोजी पुण्यातिथी आहे. या दिवसापासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.

आमदार वडकुते म्हणाले, “धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, अजून ते पाळलेले नाही. दि. 8 सप्टेंबरपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही, तर राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.’
प्रकाश शेंडगे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता या सरकारविरोधात लढा सुरू झाला आहे. आज लाक्षणिक उपोषण आहे, त्यानंतर दि. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.’

————————————

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज सन 2009 पासून आंदोलन करत आहे. मात्र, आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषेदचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी केली केली. तसेच याबाबत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

————————————
समाजाच्या अन्य मागण्या
– सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे.
– शेळी-मेंढी आर्थिक विकास महामंडळाला 1 हजार कोटी रुपयांचा निधी देणे.
– समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये व्यवसायासाठी अनुदान.
– प्रत्येक तालुक्‍यांमध्ये या समाजातील मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)