“धनगर आरक्षणा’चा टाटांचा अहवाल मांडा

मधुकरराव पिचड यांची मागणी;भाजपचा राजकीय दबावामुळे निर्णय
अकोले – धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने भाजपच्या सरकारने टाटा संशोधन संस्थेला अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे या संस्थेचा अहवाल 31 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला सादर झाला आहे. हा अहवाल भाजप सरकारने जनतेसमोर ताबडतोब मांडावा, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे.
धनगर समाजाने आपला आदिवासींमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप सरकारने राजकीय दबावापोटी टाटा संशोधन संस्थेला यादृष्टीने अभ्यास करण्यास सांगितले होते. वास्तविक हे काम पुण्याच्या आदिवासी संशोधन समितीला द्यायला हवे होते; परंतु तसे झाले नाही. या विषयावर भाजप सरकारने चार वर्षे राजकारण केले. जाणीवपूर्वक हे काम टाटा संशोधन संस्थेला दिले. गरीब व दीनदुबळ्या आदिवासी समाजाला अंधारात ठेवून त्यांच्या ताटातले काढून खोटया आदिवासींच्या पुढे ताट वाढण्याचे हे कृत्य घृणास्पदच नाही, तर आदिवासी समाजावर पुढे अनेक वर्ष घोर अन्याय करणारे ठरणार आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. धनगर ,समाज आदिवासी आहे, की नाही, याचा अभ्यास करण्याचे काम स्वायत्त असणाऱ्या आदिवासी संशोधन समितीकडे का दिले नाही, असा सवाल करून पिचड म्हणाले, की टाटा संशोधन संस्थेने हा अहवाल 31 ऑगस्टला राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानंतर सरकारने हा अहवाल काय आहे, हे जनतेसमोर मांडणे आवश्‍यक व गरजेचे असताना हा अहवाल लपून ठेवला आहे. या अहवालात काय आहे, हे पुढे येणे गरजेचे असून तो सरकारने ताबडतोब 24 तासांच्या आत जाहीर करावा, असे आवाहन करून तसे न घडल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा पिचड यांनी दिला आहे.
राज्यातल्या भाजप सरकारने आतापर्यंत जनतेची दिशाभूल केली आहे. यापुढे करू नये. धनगर खरे आदिवासी आहेत, की नाही याबद्दल अहवालात काय म्हटले आहे, ते ही स्पष्ट होईल; पण सरकारने हा अहवाल का लपवून ठेवला, असा पिचड यांनी केला. हा अहवाल सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे. याबाबत आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री, सचिव यांच्याशीदेखील या अहवालाबाबत बोललो; पण ते ही याबाबत बोलायला तयार नाहीत. धनगर समाजाने आंदोलन तीव्र केल्यामुळेच सरकार जागे झाले असले, तरी सरकाने हा अहवाल जनतेसमोर मांडावा, असे पिचड यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)