धनगरवाडी गावच्या हद्दीत केमिकल टॅंकर पेटला

धनगरवाडी ः आगीत भस्मसात झालेला केमिकल टँकर.

जीवितहानी नाही : चार तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात

शिरवळ, दि. 4 (प्रतिनिधी) – धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये आशियाई महामार्गावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सेवा रस्त्यावर केमिकलने भरलेला अचानकपणे टॅंकर पलटी झाला. यामुळे आग लागून टॅंकर भस्मसात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग आटोक्‍यात आणण्यात यश आले आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुजरात येथून स्थेरिंग मोनोमल हे केमिकलने भरलेला टॅंकर (जीजे- 12- बीव्ही-2682) हा धनगरवाडी येथील एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीमध्ये जात होता. दरम्यान, टॅंकर धनगरवाडी गावच्या हद्दीत पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास आला असता आशियाई महामार्गावरील पुणेहुन सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नजीकच्या सेवा रस्त्यावर अचानकपणे पलटी झाला. यावेळी टॅंकर पलटी झाल्यानंतर टॅंकरमधील केमिकल सांडल्याने टॅंकरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यावेळी टॅंकरचालककाने व क्‍लिनरने प्रसंगावधान दाखवत तातडीने टॅंकरमधून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार धिरज यादव, अविनाश डेरे, विकास इंगवले, विकास देवकर, दिग्विजय पोळ यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने एशिअन पेन्ट्‌स येथील अग्निशमन दलाला पाचारण करत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. पहाटेची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ नसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. पाचगणी, भोर, फलटण, एशिअन पेन्ट्‌स कंपनीच्या अग्निशमन दलाने चार तास अथक परिश्रम घेत आग आटोक्‍यात आणली. यावेळी आग आटोक्‍यात आणल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने जळालेला टॅंकर बाजूला काढण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून तपास हवालदार धीरज यादव करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)