धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर टाच

बीड जिल्हा सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी आठ संचालकांवर कारवाई


मुंडे फरार कसे? न्यायालयाचे पोलिसांवर कडक ताशेरे

बीड – राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बॅंक घोटाळ्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली असून हे प्रकरण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे.

परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही.

संत जगमित्र सूतगिरणी प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्यामार्फत सुरू आहे. जी. श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी एका शपथपत्राद्वारे जगमित्र सूतगिरणीने घेतलेले कर्ज विनातारण कसे घेतले? या संदर्भात अंबाजोगाई येथील न्यायालयाकडे मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची दखल 5 सप्टेंबर 2018 रोजी दुसरे अप्परसत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी घेतली. एसआयटीच्या अहवालानुसार जनतेच्या पैशाची लुबाडणूक वैयक्तिक स्वार्थाकरीता केल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

संत जगमित्र सुतगिरणी गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने कडक ताशेरे ओढत धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपुर येथील शेतजमिनीसह परळी येथील अंबाजोगाई रोडवरील घर, जगमित्र ऑफिस जप्तीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, याबाबत न्यायालयाने पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. संपूर्ण तपासकाळात या प्रकरणातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे पोलिसांनी फरार कसे दाखवले? असा सवाल करत जिल्हा न्यायाधिशांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

निकालाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे
संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या कर्जाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची संपत्ती जप्त करा, असे कोठेही म्हटलेले नाही. तर सुतगिरणीच्या सर्व संचालकांची अर्जात नमूद केलेली प्रॉपर्टी विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही, असे म्हटले आहे.

तसेच हा निकाल अंतिम नसून अंतरिम आहे. सदर नोटीस प्राप्त होताच आम्ही न्यायालयात हजर राहून हा आदेश रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देण्यात येईल, असे मुंडे यांनी म्हटले आहे. डीसीसी बॅंक ज्यांनी बुडवली आणि चार वर्ष कारावासही भोगला ते महारथी भाजपाचेच कार्यकर्ते व नेते आहेत.

आजही ते पालकमंत्र्यांसोबत जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. हे संपूर्ण जिल्ह्याला माहित असताना न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करणाऱ्यांचा हा प्रकार म्हणजे “उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)