धनंजय महाडिक यांच्या रथाचे सारथ्य जनतेच्याच हाती – बाबा महाराज सातारकर


कोल्हापूर – सर्वांना सहभागी होण्याची समान संधी असणारं किर्तन कलियुगातील अत्यंत महत्वाचं साधन आहे. वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. स्त्रीयांना समानतेचा दर्जा आणि माऊलीच्या रूपात पाहिलं जातं, असं प्रतिपादन बाबा महाराज सातारकर यांनी केलं. खासदार धनंजय महाडिक यांच्या निवडणूकीच्या रथाचं सारथ्य कृष्णरूपी जनता करत असल्यानं, त्यांचं भविष्य उज्वल आहे असे उद्गार काढून परमपुज्य बाबा महाराज सातारकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या येत्या लोकसभेतील विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलं. शिवाजी स्टेडियम इथं आयोजित वारकरी महामेळाव्यात ते बोलत होते.

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून शिवाजी स्टेडियम इथं वारकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रंथराज, ज्ञानेश्‍वरी, पारायण सोहळा आणि श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी श्रीगुरू बाळासो देहूकर, भानुदास यादव महाराज, भाऊसाहेब पाटील महाराज, डॉ. श्रीकृष्ण देशमुख महाराज, देवव्रत वास्कर महाराज यांना वारकरी जीवनगौरव पुरस्कारानं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरूण नरके, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.

दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना, ही संत मंडळी समाज सुधारण्याचं काम करत आहेत. संस्कारशिल समाज घडवण्यासाठी संत मंडळींनी दिलेल्या योगदानामुळंच भारतात जगाच्या तुलनेत गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केलं. आपणही गावागावात ज्ञानेश्‍वरी ग्रंथ वाटप करण्याबरोबरच गावांसाठी वाचनालय, पुस्तकं, व्यायाम शाळा देण्याचा प्रयत्न केला, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणूकीसाठी जनतेनं आपल्याला आशिर्वाद द्यावेत आणि माझ्या निवडणूकीच्या रथाचं सारथ्य करावं, अशी भावनिक साद खासदार धनंजय महाडिक यांनी घातली. बाळासो देहूकर महाराज यांनी, धर्म, निती आणि सत्याच्या बाजुनं असणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना जनता जनार्दनाचा आशिर्वाद असल्यामुळं त्यांचा येणाऱ्या निवडणूकीत विजय निश्‍चित असल्याचं नमुद केलं. पसायदान होवून बाबा महाराज सातारकर यांच्या किर्तनाला सुरवात झाली. सफेद टोपी, धोतर, सदरा परिधान केलेले वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रखुमाईचा गजर करत डोलत होते.

खासदार धनंजय महाडिक यांनी, बाबा महाराज सातारकर यांना तर सौ. अरूंधती महाडिक यांनी भगवतीताई महाराज यांना शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशिर्वाद घेतला. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय किर्तनातून साधला जातो. सांप्रदायाच्या माध्यमातून देव म्हणजे काय, याची जाणीव होते. विठ्ठल भक्तीच्या उपासनेनं मनाला शांती लाभते, असं बाबा महाराज यांनी नमुद केलं. आपल्याला न पटणारी गोष्ट एखाद्यानं केली तर प्रथा पाळली नाही अशी ओरड केली जाते. पण ज्यानं जी गोष्ट केली ती त्याच्या दृष्टीनं प्रथाच असते. अतिरेक्‍यांना मारून प्रश्‍न सुटणार नाही, तर अतिरेकी वृत्ती संपवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असं त्यांनी सांगितलं. वारकरी संप्रदायात स्त्रीयांना समानतेचा दर्जा देवून माऊलीच्या रूपात पाहिलं जातं आणि संतांच्या विचारातून क्रांती घडल्याचं बाबा महाराज सातारकर यांनी नमुद केलं. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या निवडणूकीच्या रथाचं सारथ्य कृष्णरूपी जनता करत आहे. पांडवांचं सैन्य धनंजय महाडिक यांच्या बाजुनं असल्यानं, त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे उद्गार काढून बाबा महाराज सातारकर यांनी येत्या निवडणूकीत धनंजय महाडिक यांच्या विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं. किर्तन सोहळ्याप्रसंगी बाबा महाराज सातारकर यांना चिन्मय महाराज आणि भगवतीताई महाराज यांनी साथ दिली.

यावेळी धारवाडकर गुरूजी, बाळासाहेब पाटील महाराज, नवनाथ गडगे महाराज, लाला महाराज, कृष्णराज अहिरे महाराज, निवृत्ती पाटील महाराज, श्रीधर सुतार महाराज, चांदेकर माऊली, दिनकर पाटील महाराज, भानूदास महाराज यांच्या पत्नी अश्‍विनी यादव, जलसंपदा विभागाचे माजी सचिव एकनाथ पाटील, प्रियांका सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचं संयोजन जगन्नाथ महाराज पाटील, महादेव यादव महाराज यांनी उत्तमरित्या केलं. यावेळी मंगल महाडिक, शकुंतला महाडिक, स्वरूप महाडिक, नगरसेविका रूपाराणी निकम, नगरसेवक सत्यजित कदम, किरण नकाते, माजी नगरसेवक सुहास लटोरे, संग्राम निकम यांच्यासह मान्यवर आणि वारकरी संप्रदायातील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)