धक्‍कादायक! लालूप्रसाद यादव यांच्या मुलांची संपत्ती जप्त

आयकर विभागाकडून बेहिशेबी संपत्तीवर टाच

पाटणा : आयकर विभागाने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांच्या मुलांची बेहिशेबी संपत्ती जप्त केल्याची धक्‍कदायक माहिती समोर येत आहे. लालू यादव यांच्या मुलांशी संबंधित सर्व बेहिशेबी संपत्ती जप्त केल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच राज्यसभेची खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांना समन्स बजावून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे. तसेच यावेळी बेहिशेबी व्यवहारासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासही आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. याआधी आयकर विभागाने लालूंच्या मुलांची 50 कोटींची संपत्ती जप्त केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रसाद यादव याला देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवानाही रद्द करण्यात आला होता.
बेहिशेबी कलमांतर्गत 90 दिवसांच्या आत विभागाला स्पष्टकरण देणे आवश्‍यक आहे. जर संबंधित व्यक्तीने दिलेल्या मुदतीत स्पष्टीकरण दिले नाही, तर जप्तीची कारवाई केली जाते. मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांना आयकर विभागाने दोन वेळा समन्स बजावला होता, पण ते हजर झाले नाहीत. मीडिया आणि सुरक्षेच्या कारणांमुळे उपस्थित राहता आले नाही, असे कारण त्यांनी सांगितले. याआधीही 6 जून रोजी हजर न झाल्याने आयकर विभागाने मीसा भारतींना 10 हजारांचा दंडही ठोठावला होता. मागील महिन्यात 23 मे रोजी आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लालू यादव आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित 22 ठिकाणांवर छापा टाकला होता. मात्र लालू यांनी छाप्याचा वृत्ताचा इन्कार केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)