धक्‍कादायक! पुण्यात प्रेयसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप जाळला

पुणे : प्रियकर दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय, हे समजल्यानंतर एका प्रेयसीने त्याच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकल्याची घटना पुण्यात घडली आहे. कात्रजमधील शनिनगरमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
30 वर्षीय घटस्फोटीत सुषमा टेमघरे आणि 32 वर्षीय दीपक रेणुसे यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु दीपकचा 18 मे रोजी विवाह होता. त्याच दिवशी सकाळी घराबाहेर मंडप जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबाला जाग आली. त्याआधी दीपकची मोटरसायकल रविवारी पहाटे चारच्या सुमारास रहस्यमयरित्या जळाली होती. मंडप जळाल्यानंतर पोलिसांनी दीपकची चौकशी केली. एक्‍स-गर्लफ्रेण्ड सुषमा टेमघरेने धमकी दिल्याचे दीपक रेणुसेने चौकशीत सांगितले. दीपक रेणुसेने दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्याचा घाट घातल्याने संतप्त सुषमाने त्याला लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच त्याने दिलेली लग्नपत्रिकाही तिने फाडली. मात्र जोपर्यंत मोटरसायकल जळाली नाही, तोपर्यंत दीपकने तिची धमकी गांभीर्याने घेतली नव्हती. पण जेव्हा मंडप जळाला, तेव्हा या कृत्यामागे सुषमाचा हात असल्याचा संशय दीपकला आला. दीपकने शंका दूर करण्यासाठी सुषमाला कॉल केला. त्यावेळी तिने या कृत्याची कबुली दिली. यानंतर दीपकने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. संबंधित घटनेनंतर सुषमा पसार झाली होती. पण नंतर तिला अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. माझा लग्नाचा प्रस्ताव दीपकने धुडकावला आणि लग्नाचे आमंत्रण देऊन अपमानित केले, त्यामुळे हे कृत्य केल्याचे सुषमा टेमघरेने सांगितले. सुषमाला गुरुवारी संध्याकाळी न्यायालयात सादर करण्यात आले न्यायालयाने तिला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)