धक्‍कातंत्र काय असते ते दोन दिवसांत दाखवू- प्रा. बेरड

श्रीगोंदा: नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना कॉंग्रेसने प्रवेश देत भाजपला धक्का दिला. आगामी दोन दिवसांत कॉंग्रेसलाही असाच मोठा धक्‍का देऊन धक्‍कातंत्र काय असते ते दाखवून देऊ, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती आज (दि.6) घेतल्या. आमच्याकडे सक्षम उमेदवार असून, त्यांच्या उमेदवारीवर श्रीगोंद्यातुनच शिक्कामोर्तब होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवाराची घोषणा आम्ही दोन दिवसांत करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात रविवारी सायंकाळी माऊली निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना प्रा. बेरड म्हणाले, इच्छुकांच्या मुलाखती आम्ही घेतल्या त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अतिशय सक्षम उमेदवार याठिकाणी आमच्याकडे आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे चारजण इच्छुक आहेत. दोन दिवसांत आमचा उमेदवार जाहीर होईल. नगराध्यक्षांना आयात करून उमेदवारी देण्याची केविलवाणी वेळ कॉंग्रेस आघाडीवर आली आहे. श्रीगोंद्याची जनता हुशार असून, ते योग्य निर्णय घेतील. असा विश्‍वास प्रा. बेरड यांनी व्यक्त केला.

खा. दिलीप गांधी म्हणाले, श्रीगोंदा नगरपरिषद अंतर्गत शहराचा मोठा विकास झाला. भाजप सरकारने 140 कोटी रुपयांचा निधी शहरासाठी दिला. त्याचे उत्तम नियोजन करीत माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी शहराच्या या वैभवात भर टाकली. श्रीगोंद्यासाठी नवीन वर्षात भाजप सरकारने आणखी एक गुड न्यूज दिली. श्रीगोंद्यात जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात यावे, ही येथील वकिलांची अनेक दिवसांपासून मागणी होती. तो विषय मार्गी लागलेले असून, लवकरच येथे सत्र न्यायालय सुरू होईल.

श्रीगोंद्यासाठी महत्वाचे असलेल्या नगर-पुणे लोकलसाठी आपण प्रयत्नशील असून हा विषयदेखील लवरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. तर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी नगरपरिषदेची विकास कामे मंजूर करण्यासाठी आम्ही मुंबईत असायचो अन विद्यमान नगराध्यक्ष निम्या रस्त्यात असायचे हे सांगत मनोहर पोटेंनी प्रसिद्ध केलेल्या यशोगाथा या पुस्तिकेवर टीका केली. यावेळी पक्ष निरीक्षक अल्लाउद्दीन काझी, प्रसाद ढोकरिकर, सदाशिव पाचपुते, बाळासाहेब महाडिक, बापूसाहेब गोरे, एम.डी. शिंदे, दीपक शिंदे, संतोष इथापे, सुनील वाळके, सचिन गायकवाड उपस्थित होते.


नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेशी युती नाही

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक भाजप शिवसेनेशी युती करून लढणार का याविषयी खा. दिलीप गांधी यांना विचारले असता, तसा विचार अद्याप तरी नाही. आमच्याकडे सक्षम व तुल्यबळ उमेदवार आहेत. नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याइतकी ताकद आमच्याकडे आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्‍न नाही. निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ना. विनोद तावडे, ना. रणजित पाटील आदी मंत्री येणार असल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)