धक्कादायक! मुंबईतून 3 महिन्यात 2667 जण बेपत्ता

उच्च न्यायालयात सरकारची धक्कादायक माहिती

मुंबई – पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणाहून लोंढे येत असताना या मुंबईतून बेपत्ता होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जानेवारी ते मार्च 2017 या तिन महिन्यात शंभर नव्हेतर तब्बल 2667 मुंबईकर बेपत्ता झाले आहेत. तर त्यातील 992 जणांचा अद्याप थांगपत्ताही लागलेला नाही. पोलीसांनी केवळ 1675 जणांचा शोध घेतलाअसल्याची धक्कादायक माहिती न्यायालयासमोर आल्याने न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

एका लहान मुलगा वर्षभराहून जास्त काळ बेपत्ता असल्याने त्याचा शोध घ्यावा म्हणून दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी राज्य सरकारनेच ही माहिती न्यायालयात दिले.

एक लहान मुल वर्षभराहून अधिक काळ बेपत्ता असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेताना खंडपीठाने मुंबई शहरातून बेपत्ता होणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता व्यक्त केली. बेपत्ता लोकांचा कशा पद्धतीने शोध घेता, याची सविस्तर माहिती सादर करा, असा आदेश मुंबई पोलिसांना देतानाच न्यायालयाने या प्रकरणांचा तपास करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष आहे का, अशी विचारणा केली.

यावेळी सरकारने या प्रकरणांच्या तपासाला गती देण्यासाठी मिसिंग पर्सन्स ब्युरो हे समर्पित संकेतस्थळ मुंबई पोलिसांद्वारे कार्यान्वित असल्याचे न्यायालयाला सांगितले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या संवेदनाशून्य भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळण्याची आवश्‍यकता आहे. तुम्ही बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी काय पावले उचलली जाणार आहेत, याचे केवळ अहवाल दाखल करत बसू शकत नाही, तर कृती करून त्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घ्या, असेही बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)