धक्कादायक! भाजीत मीठ जास्त पडल्याच्या रागातून पतीने पत्नीचे केसच कापले

सोलापूर : भाजीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने चक्क पत्नीचे केसच कापले. सोलापूर जिल्ह्यातल्या नान्नज गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीसोबत हे विकृत कृत्य करणाऱ्या आसिफ शेखविरोधात सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

11 एप्रिल रोजी पीडित पत्नीने जेवणात पालकाची भाजी बनवली. कामावरुन आलेल्या पती आसिफला जेवायला वाढलं. यावेळी आसिफने भाजीची स्तुती तर केली नाही, याउलट भाजीत मीठ जास्त पडले म्हणून पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली आणि नंतर राग अनावर न झाल्याने आसिफने पत्नीच्या केसांना कात्रीच लावली.

पतीचा हा असा संतापजनक प्रकार पाहून पत्नीने जीव मुठीत घेऊन घरातून पळ काढला. माहेरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर यशोदा फाऊंडेशनच्या मदतीने पत्नीने नाईलाजास्तव सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)