द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे – जितेंद्र आव्हाड

चिंचवड – हिंदू-मुस्लीम हा संघर्ष अनेक वेळा वापरून झाल्याने राजकारणासाठी सवर्ण विरूद्ध दलित ही नवी खेळी आता खेळली जात असून द्वेषाच्या या राजकारणामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे जात आहे, अशी भिती आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.

मोहननगर येथील दत्त मंदिर चौकात जय भवानी तरुण मंडळ आणि कालीमाता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना आमदार आव्हाड बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रमोद कुटे होते. खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका वैशाली काळभोर, रजनी काळे, संगीता गोडगे-पाटील, कॅप्टन नारायण दास, शंकर पांढारकर, भगवान पठारे, नारायण बहिरवाडे, गोविंद काळभोर आदी उपस्थित होते.
मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जेम्स लेनचे पुस्तक हा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉईन्ट होता. बहुजनांमध्ये वाचन संस्कृती कमी असल्याने शालेय जीवनात जो विकृत इतिहास आम्हाला सांगितला गेला, तोच आम्ही ग्राह्य धरला. जेम्स लेन प्रकरणातून धक्का बसल्याने महाराष्ट्र खडबडून जागा झाला. वास्तविक जेम्सला माहिती देणारे हे आमच्यातलेच काही गद्दार होते. वास्तविक दुष्काळी परिस्थितीत विजापूरला पाच हजार पोती धान्य पाठवणारे, आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रगल्भ आणि पुरोगामी असताना त्यांची प्रतिमा मात्र गोब्राह्मणप्रतिपालक आणि मुस्लीमविरोधी अशी कट्टर धार्मिक म्हणून रंगवण्यात आली. अफजलखान, शाहिस्तेखान हे फक्त मुस्लीम होते म्हणूनच शिवाजी महाराज त्यांच्या विरोधात लढले अशी मुस्लीम द्वेषभावना शालेय वयापासून मुलांच्या मनात रुजवण्यात आली.

लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आलेला हिटलर हा पुढे हुकूमशहा झाला, तोच धोका आता देशात संभवतो आहे. भीमा-कोरेगाव येथे अनेक वर्षांपासून लोक येतात; परंतु इतिहासाचे विकृतीकरण करून तेथे विध्वंसक परिस्थिती निर्माण करण्यात आली. पानिपतपूर्वी सर्व लढाया पेशव्यांनी जिंकल्यात; पण पानिपतात मराठे लढले म्हणून हरले, असे इतिहासात बिंबवले जात आहे. वास्तविक पेशव्यांनी दलितांना पशूपेक्षाही हीन वागणूक दिल्याने त्यांनी बंड केले, हे भीमा-कोरेगावबाबत कोणी बोलत नाही. संभाजी महाराजांची समाधी गावकुसाबाहेर दलित वस्तीत का आहे? याविषयी कोणी बोलत नाही; तसेच औरंगजेब जर जिहादी होता; तर त्याने शाहू महाराजांना जिवंत का ठेवले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले.

दिगंबर बालुरे, प्रदीप गांधलीकर, अभिजित भापकर, गोरख देवकाते, अनिल जाधव यांनी संयोजन केले. अभिजित शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ नखाते यांनी आभार मानले.

देशाची अर्थव्यवस्था संभ्रमीत!
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हुतात्मा राजगुरू आमचा आहे, असे म्हणू लागला आहे, असे सांगून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कथुआ-उन्नावसारख्या घटना घडत असूनही समाज संवेदनाहीन झाला आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली, त्यांची जयंती पहिल्यांदा साजरी केली; पण त्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना दिले जाते. 2019 नंतर आपल्या देशात निवडणुका होतील की नाही, अशी आता भीती वाटू लागली आहे. पूर्वी कधी नव्हती एवढी अर्थव्यवस्था संभ्रमित झालेली आहे. बाबासाहेबांनी आरक्षण हे आर्थिक निकषांवर आणले नाही तर सामाजिक समानतेसाठी आणले; पण हे सरकार दलितविरोधी आहे. अशी विपरीत परिस्थिती असली तरी या देशात इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या हे लक्षात घेतले पाहिजे; कारण इथली जनता शाश्वत असल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)