द्वेषाचे राजकारण कधी केले नाही अन्‌ करणार नाही

रणजितसिंह नाईक-निंबाळकर : कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

फलटण – राजकारणात सक्रीय झाल्यापासून आजपर्यंत कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही आणि यापुढेही करणार नाही. फलटण तालुक्‍याने आजवर खूप काही दिले आहे, येथील जनतेने नेहमीच विश्‍वास दाखवला आहे, त्यामुळे तालुक्‍याला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथे आयोजित राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, जि. प. सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव, महिला अध्यक्षा नंदिनी सावंत, शहराध्यक्षा स्विटी शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, या तालुक्‍यात आपण स्वराजच्या माध्यमातून दूध डेअरी, साखर कारखाना, पतसंस्था नव्याने उभ्या करून नावारूपास आणल्या व हजारो हातांना काम दिले आहे.

आम्ही कधीही तालुक्‍यातील दूध संघ असो श्रीराम कारखाना असो की इतर सहकारी संस्था असो त्यांच्या बाबतीत व्यक्तीशः कधीही उचापती काढण्याचा प्रयत्न केला नाही. कारण ते आमच्या रक्तात नाही. या संस्था टिकल्या पाहिजेत, कामगार टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. सत्तेचा ताम्ररपट कोणी घेवून आले नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते, तालुक्‍यातील कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांने सांगावे की रणजितसिंहने त्यांच्या विरोधात कधी अन्याय केलाय, कधी पोलिसांना सांगून त्रास दिला. राजकारणामध्ये जे पावित्र ठेवावे लागते ते ठेवण्याचे काम आपण केले असल्याचे रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले. यावेळी समशेरसिंह नाईक- निंबाळकर, जिजामाला नाईक- निंबाळकर, जयकुमार शिंदे, बाळासोहब कदम, नानासो इवरे आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष पदाच्या निर्णयाला सर्वांचे एकमत
जिल्हाध्यक्षपदाबाबत आपल्याला वेळोवेळी विचारणा झाली. कामाच्या व्यापामुळे आपण ते टाळत होतो. पण, जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांचे आपल्या नावावर एकमत झाले व पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला पद घेण्यासंबंधी आदेश केला आहे. जिल्ह्यातील जबाबदारी पार पाडताना तालुक्‍यातील जबाबदारी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांवर पडणार असून त्यांनी ती घ्यावी, कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काम अडणार नाही, असेही रणजितसिंह यावेळी म्हणाले.

रामराजेंना अप्रत्यक्ष टोला
तालुक्‍याने आपल्या घराला खूप काही दिले वडील हिंदुराव निंबाळकर यांना खासदार केले. मला वयाच्या 35 व्यावर्षी राज्यमंत्री दर्जा असलेल्या महामंडळावर काम करण्याची संधी मिळाली. नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीसुध्दा मंजुर असून ही एमअगयडीसी आपण कोणत्याही परिस्थितीत करणारच आहे. पण कोण काही नवीन करायला लागल की काहीच्या पोटात दुखतं, कारखाना काढयला लागलो तर आठव आश्‍चर्य होईल म्हणतात, ज्यांनी एकही संस्था काढली नाही, एकही उद्योग उभा केला नाही. उलट बापजाद्याच्या संस्था दुसऱ्याला चालवायला दिल्या. त्यांना बोलायला काय जातंय असा टोला शेवटी रणजितसिंह यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)