द्रौपदीसी बंधू शोभे नारायण…

अनुराधा पवार

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण……..
या गाण्याचे शब्द माझ्या कानी पडले आणि माझे पाय थबकले. मी मंडईत जात होते. जवळून जाणाऱ्या एका गाडीतून त्या गाण्याचे शब्द बाहेर पडत होते. साऊंड क्वालिटी एकदम छान होती. गाडी पुढे जाईपर्यंत गाण्यातल्या कोरसमधील त्या दोनच ओळी माझ्या कानी पडल्या “द्रौपदीसी बंधू शोभे नारायण…. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण …

आणि माझे मन हरखून गेले. श्‍यामची आई चित्रपटातील ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागले. अगदी जुन्या वळणाचे कोकणातील घर, कोपऱ्यात मोठा देव्हारा. त्याच्या एका बाजूला वाती वळत बसलेली श्‍यामची आई, तिच्या मांडीवर डोके टेकून निजलेला श्‍यामचा भाऊ. अगोदर झोपाळ्यवर झोपलेला आणि नंतर रागाने भावाचे पाय दाबून देणारा श्‍याम, , देव्हाऱ्याच्या समोर बसलेली त्याची आजी, आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेला धाकटा भाऊ…..आताच्या काळात स्वप्नवत वाटावा असा जिव्हाळा, प्रेम, साधेपणा आणि प्रांजळपणा. नाही म्हटले तरी आजच्या या तथाकथित आधुनिक, सुखसोयींनी भरभरून वाहणाऱ्या जगात आम्ही काय गमावले आहे याची काळजात कळ निर्माण करणारी जाणीव करून देणारे वातावरण…..

मला जगजित सिंग यांच्या ओळी आठवल्या….ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो भला छीन लो मुझसे मेरी जवानी …..मगर मुझको लौटादो बचपन का सावन…….जगजित सिंग यांच्या आवाजातील हे शब्दही असेच काळजाची तार छेडून जातात….बेचैन करतात…ऐकता ऐकता डोळे भरून येतात आणि कंठाशी आलेला हुंदका आवरणे कठीण होऊन बसते. अर्थात हे विषयांतर झाले. पण आठवणींचे असेच आहे. समुद्रात भरतीच्या लाटांवर लाटा याव्यात तशा आठवणी एकामागून एक येत राहतात. आता रस्त्यातून जाता जाता कानी पडलेल्या “द्रौपदीसी बंधू शोभे नारायण……ने असाच मनात कल्लोळ उठवला.

एखादे गाणे, असे असते,की दर वेळी ऐकताना भावना हेलावून जातात. डोळे पाणावतात. समोर चित्र उभे राहते. असे एखादे गाणे मर्मबंधातली ठेव बनून जाते. कितीही वेळा ऐकले तरी त्यातली गोडी कमी होत नाही. असेच गाणे आहे श्‍यामची आई या चित्रपटातील. त्या गाण्याचे शब्द , चाल, स्वर आणि गाण्याचे चित्रीकरण आणि मनात झिरपत झिरपत जाणारा तो कोरस, “द्रौपदीसी बंधू शोभे नारायण …. सारे कसे दुग्धशर्करा योगासारखे जुळून आले आहे. गाणे ऐकायला लागले की चित्रपटातील ते सारे दृष्य डोळयासमोर तरळू लागते. मनात कातर भावनांचे काहूर उठते.
श्‍यामची आई हा आचार्य अत्रे यांचा पहिला आणि एकमेव चित्रपट. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिलेच राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. तशी साने गुरुजींची श्‍यामची आई ही कादंबरी हृदयाला हात घालणारी कादंबरी. भारतीय संस्कृती म्हणजे काय याचे साक्षात दर्शन घडवणारी.

आणि द्रौपदीचा बंधू शोभणारा नारायण…कृष्णकन्हैया….. ती तर आमच्या मर्मबंधातील ठेव. कृष्णाच्या बाललीला, रासलीला, विश्‍वरूप दर्शन यांच्याइतकेच त्याचे भगिनीप्रेमही उत्कट. शब्दाविणा प्रकट होणारे. पण आम्ही त्याच्या रासलीलांचा गवगवा जास्त करतो; सार्वजनिक रीतीने. तसा त्याचा भगिनीप्रेम दिन का बरे साजरा करत नाही? का कृष्णाच्या आठवणीने बहिणीसाठी काही करत नाही.
माझ्या एका मैत्रिणीने चारपाच वर्षांपूर्वी सहजपणे सांगितलेला किस्सा मला यावरून आठवला. तिच्या भावाचे नावही कृष्णच होते हा दैवदुर्विलास. या कृष्णाने बहिणीला आपल्या गावी जाताना गाडीतून, ते हे स्पेशल किंवा खास नव्हे. गाडीत जागा आहे म्हणून नेले, तर वाटेत हॉटेलचा खर्च करायला लावला आणि टोलही तिच्या माथी मारला, वयाची साठी जवळ आलेल्या तिला पुन्हा गावी जावेसे वाटले होते. चार दशकांनी. पुन्हा भेटीचा योग येतो-न येतो म्हणून बालपणीच्या सहकाऱ्यांना उतारवयात भेटावेसे वाटले होते. म्हणून कधी नव्हे ती तिने त्याला गळ घातली होती, ती अशी फळली. अर्थात ती नाराज नाही झाली, पण तरीही हा किरकोळ हिशोबीपणा नाही म्हटले तरी मनात सलत राहतोच. तिच्याही राहिला. तो तिने मला दाखवला. मित्रांना-मैत्रिणींना भेटायला 400 किलोमीटर्स हसत हसत जाणाऱ्या भावाला चार किलोमीटरवरील बहिणीकडे जायला वर्ष वर्ष फुरसत होऊ नये हे आणखी एक शल्य. कर्णाच्या रथाच्या सारथ्यासारखे. विद्ध करणारे. पण कर्णासारखे ते कानामागे टाकत जीवनाच्या रणांगणात लढत राहायचे असते.

व्हाट्‌सऍप वगैरे प्रकार अनेक वेळा मला बेगडी वाटतात. फुकटचे आणि विनात्रासाच्या बेगडी प्रेमाचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा प्रकार. काहींच्या बाबतीत तर प्रातर्विधीसारखा सवयीचा बनलेला.
द्रौपदी आणि कृष्ण म्हणजे भाऊबहिणीच्या प्रेमाचा आदर्श. कृष्णाच्या इतर लीलांप्रमाणे त्याचे भगिनीप्रेमही अजरामर झालेले आहे. हाक न मारताही धावून येणारा भाऊ म्हणजे श्रीकृष्ण. म्हणूनच मनात गुंजत राहते…

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण….


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)