द्रूतगती मार्गावरील अपघातात चार जणांचा मृत्यू

पाच जण जखमी : आडोशी बोगद्याजवळील घटना

लोणावळा – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ झाले आहेत. यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास किमी 41 जवळ मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मृतांमध्ये सेलेरिओ या कार मधील निकिता अविनाश आंग्रे (वय-25) व चित्रा अविनाश आंग्रे (वय-42, दोघी रा. औंध, पुणे) या मायलेकीचा व स्विफ्ट मध्ये बसलेल्या मृणाली श्रीकांत कुडेकर (वय-65, रा. पुणे) यांचा समावेश आहे. तर हसन मेहबूब शहा पटेल असे मृत ट्रक क्‍लिनरचे नाव आहे. अविनाश नारायण आंग्रे आणि जितेंद्र भास्कर बिरारी अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 12, एलटी 3356) हा आडोशी बोगदा पार करुन जात बोगद्याच्या पुढे असणाऱ्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन सुरक्षा कठडे तोडत जाऊन पुढे पुना लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक स्विफ्ट (एमएच 12, केएन 3460), एक सेलेरिओ (एमएच 12, पीटी 9031)आणि एक इनोव्हा (जीजे 16, एयू 3647) आशा तीन कार या ट्रकखाली चिरडल्याने त्यामधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात ट्रक क्‍लिनर चाही समावेश आहे.

ट्रक खाली चिरडल्या गेलेल्या तीन कार पैकी एक स्विफ्ट कार तर ट्रकच्या धडकेने बाजूच्या खोल दरीत साधारणपणे 100 फूट खोल फेकली गेली. क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्यात आली. अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. सदर अपघाताची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस तसेच काही स्थानिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह आयआरबी, डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले. अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पसरलेले सिमेंट बाजुला करण्याचे काम सुरू केले. साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन रस्ता हळूहळू पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)