दर्जा घसरला : उत्पादित मालाला अपेक्षेपेक्षा कमी भाव
पुणे – हंगामपूर्व द्राक्षाच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका मोठा बसला आहे. त्यामुळे फळाला तडे गेले आहेत. यात पहिल्या तोडाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या दर्जाहिन द्राक्षे येत असून 15 डिसेंबरपासून चांगला माल बाजारात येईल, अशी अपेक्षा व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या मार्केट यार्डात जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातून आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून द्राक्षांची आवक होत आहे. अजून सांगली जिल्ह्यातून आवक सुरू झालेली नाही. साधारणपणे डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. तो एप्रिलअखेर चालतो. मात्र, दोन पैसे जास्त मिळावेत, या अपेक्षेने शेतकरी हंगामपूर्व माल बाजारात आणत आहेत. विशेषत: बारामती, इंदापूर भागातील शेतकरी असे पीक घेतात. त्यानुसार शेतकऱ्यांना दरवर्षी अपेक्षेनुसार जास्त भाव मिळतो. यावर्षी बसलेल्या फटक्यामुळे फळातून पाणी बाहेर येत आहे. त्यानंतर त्याला बुरशी लागते. त्यामुळे ही द्राक्षे फार काळ टिकत नाहीत. ग्राहकदेखील असे फळ खरेदी करत नाहीत. परिणामी, किरकोळ स्टॉल विक्रेत्यांकडून मागणी नसल्याचे मोरे यांनी सांगितले. दर्जेदार माल बाजारात आला असता, तर आणखी जास्त भाव मिळाला असता, असेही मोरे म्हणाले.
असे आहेत सध्याचे भाव
रविवारी मार्केट यार्डातील फळ बाजारात सुमारे 5 ते 6 टन द्राक्षांची आवक झाली. सोनाका द्राक्षाला घाऊक बाजारात 15 किलोला दर्जानुसार 1200 ते 1500 रुपये, तर जम्बो द्राक्षांच्या दहा किलोला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. हा भाव नेहमीच्या तुलनेत कमी आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हंगामपूर्व द्राक्षाला फटका बसला आहे. बऱ्याचदा हे हंगामपूर्व पीकच शेतकऱ्याला भाव मिळवून देते. त्यामुळे यावर्षी केवळ मलाच नाही, तर बारामती, इंदापूर तालुक्यांतील बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
– मदन शिंदे, शेतकरी, बारामती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा