द्रविडशी संवादामुळे दडपण निवळले युवा फलंदाज हनुमा विहारीची कबुली

लंडन: इंग्लंडविरुद्ध येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा युवा फलंदाज हनुमा विहारी पहिल्याच कसोटीतील कामगिरीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. विहारीने आपल्या झुंजार अर्धशतकी खेळीमागचे रहस्य उलगडले असून भारत अ संघातील आपले प्रशिक्षक व महान खेळाडू राहुल द्रविड यांच्याशी चर्चेमुळेच माझ्यावरील दडपण निवळले आणि मी चांगली खेळी करू शकलो, अशी कबुली त्याने दिली.

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर हनुमा विहारी पत्रकारांशी बोलत होता. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली ही कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातील पराभवाबरोबरच 1-3 अशी गमावली होती. त्यामुळे भारताने अखेरच्या सामन्यात संघात बदल करताना हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्‍विनच्या जागी रवींद्र जडेजा यांची निवड केली. दरम्यान करुण नायरच्या ऐवजी हनुमा विहारी निवडला गेल्याने संघव्यवस्थापनावर टीका सुरू झाली होती.मात्र हनुमाने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक झळकावताना रवींद्र जडेजाच्या साथीत महत्त्वपूर्ण अशी 77 धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरलाच, पण आपल्या टीकाकारांनाही शांत केले आहे.

हनुमा विहारीच्या आधी तीन भारतीय खेळाडूंनी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. त्यात पहिले नाव रुसी मोदी यांचे असून त्यांनी 1946 मध्ये पहिल्याच कसोटीत नाबाद 57 धावा केल्या होत्या. त्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीने 1996 मध्ये 131 धावा केल्या होत्या. तर राहुल द्रविड याने पदार्पणाच्या कसोटी डावात 95 धावांची खेळी केली होती. राहुल द्रविड सध्या भारत अ आणि भारतीय युवक संघांचे प्रशिक्षक आहेत.

दरम्यान हनुमा म्हणाला की, पदार्पणाच्या सामन्यात तुमच्यावर प्रचंड दडपण असते. अशा वेळी तुम्हाला मानसिक आधार मिळायला हवा. ज्यावेळी भारतीय फलंदाज एकापाठोपाठ परतत होते, तेव्हा मी राहुल द्रविड यांना फोन केला आणि सामन्याबाबत चर्चा केली या वेळी द्रविड यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवताना सांगितले की, तू बिनधास्त फलंदाजीला जा. तुझ्याकडे तांत्रिक कौशल्य तर आहेच, शिवाय अशा वेळी फलंदाजी करण्याचे कसबही आहे. त्यामुळे तू कोणतेही दडपण न घेता चांगली खेळी कर.

ज्यावेळी द्रविडसारखा मोठा खेळाडू तुमच्याबद्दल असा विश्‍वास व्यक्‍त करतो, त्यावेळी तुम्ही संपूर्ण दबाव झुगारून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फलंदाजी करता, असे सांगताना हनुमाने आपल्या पहिल्या अर्धशतकी खेळीचे श्रेय राहुल द्रविड यांनाच दिले आहे. दरम्यान हनुमा विहारी हा कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा 26वा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून 82 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे.
दुसरीकडे, विहारी बाद झाल्यानंतरही जडेजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि त्याने नाबाद 86 धावांची दमदार खेळी साकारली. जडेजाने 156 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि एक षटकारही लगावला. यावेळी जडेजाला तळाच्या फलंदाजांची साथ थोडीशी जरी साथ मिळाली असती, तर त्याने आपल्या शतकासह भारताला आघाडीही मिळवून दिली असती. त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही जडेजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जडेजाला संघाबाहेर बसवणे ही कर्णधार विराट कोहली आणि संघव्यवस्थापन यांची किती मोठी चूक होती, हे त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)