जकार्ता: महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या द्युती चंदने चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र युवा धावपटू हिमा दासने चुकीची सुरुवात केल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या द्युतीने 200 मीटर शर्यतीतील उपान्त्य फेरीत जोरदार सुरुवात करताना 23.00 सेकंदात पहिले स्थान मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तिची ही कामगिरी पात्रता फेरीपेक्षा चांगली झाल्याने या प्रकारातही तिच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.
एडिडॉंग ओडिआँगने 23.01 सेकंदांत स्पर्धा पूर्ण करत दुसरे स्थान मिळवले, तर लिंगवेइ कॉंगने 23.32 सेकंदांत स्पर्धा पूर्ण करताना तिसऱ्या स्थानासह अंतिम फेरी गाठली. दरम्यान 400 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी हिमा या स्पर्धेतही सहभागी झाली होती. मात्र “फॉल्स स्टार्ट’बद्दल अपात्र ठरविण्यात आल्याने तिला बाहेर पडावे लागले. आता हिमा दास 400 मीटरच्या मिश्र दुहेरी रीले स्पर्धेत सहभागी होणार असून तिच्याकडून तेथे देखील पदकाची अपेक्षा केली जात आहे. 200 मीटर शर्यतीतील पात्रता फेरीत द्युतीने हिमापेक्षा वेगाने स्पर्धा पूर्ण करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला. द्युतीने 23.37 सेकंदांत स्पर्धा संपवली, तर हिमाने 23.47 सेकंदात अंतिम रेषा पार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)