दौलतच्या 11 हजार साखर पोत्यांची परस्पर विक्री

जिल्ह्यात खळबळ; सुरक्षा रक्षक असताना झाली विक्री

कोल्हापूर – चंदगड तालुक्‍यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या न्यूट्रियन्स कंपनीच्या सील केलेल्या गोदामातील साडेचार कोटी रु. किमतीची सुमारे 11 हजार 9 साखर पोत्यांची परस्पर विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण, काही अधिकारी, सुरक्षारक्षकांचे एक पथक तातडीने कारखान्याकडे रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत या पथकाने गायब साखर पोत्यांची माहिती घेतली असून याप्रकरणी दुजोरा दिल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हा बॅंकेने दौलत कारखाना न्यूट्रियन्स कंपनीला 45 वर्षांच्या करारावर चालवण्यासाठी दिला आहे. हा कारखाना जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जात आहे. कंपनीने पहिल्याच वर्षी सव्वा लाख टन उसाचे गाळप केले आहे. थकीत कर्जापोटी जिल्हा बॅंकेने साखरेची गोदामे सील केली होती. कुलूप तोडून साखर बाहेर काढली असल्याची चर्चा आहे.

कारखान्यातील साखरेची परस्पर विक्री झाल्याचे समजताच शुक्रवारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हलकर्णी येथील कारखान्याच्या कार्यस्थळावर दाखल झाले. जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर साखरेच्या गोदामांची कसून तपासणी केली. यामध्ये अंदाजे आजच्या बाजारभावाप्रमाणे साडेचार कोटींची साखर गायब झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साखर पोत्यांचा ताळमेळ लागत नसल्याने आणखी दोन दिवस चौकशीसाठी वेळ लागणार असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बॅंकेचे अधिकारी चंदगड पोलिस ठाण्यात होते. पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनीही कारखाना स्थळावर रात्री भेट दिली. मात्र, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती. कारखान्यावर सुरक्षारक्षक अहोरात्र तैनात असतात. तरी साखर पोती चोरी झालीच कशी, असा प्रश्‍न शेतकरी व कामगारांसह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही पडला आहे. जिल्हा बॅंकेच्या कर्जाला दौलत सहकारी साखर कारखान्याची साखर तारण देण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या परवानगीशिवाय ही साखर विक्री करता येत नाही. दौलत कारखान्याचा अप्रत्यक्ष कार्यभार जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्याकडे आहे. असे असताना जिल्हा बॅंकेला अंधारात ठेवून दौलत कारखान्याच्या साखरेची विक्री झाल्याने जिल्हा बॅंक व्यवस्थापनही गोंधळून गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)