पिंपरी- महापौरांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेच महत्त्वाचे पदाधिकारी व अधिकारी बार्सिलोना येथे आयोजित केलेले स्मार्ट सिटी चर्चासत्रात सहभागी झाले होते. है दौरे म्हणजे करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच आहे. महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी या दौऱ्याचा अहवाल जनतेसमोर मांडावा, अशी मागणी कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटीच्या चर्चासत्रासाठी 21 लाख रुपये खर्च करुन महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सह शहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले होते. वास्तविक पाहता, विरोधी पक्षाने व इतर गटनेत्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला पाहिजे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करणे, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु, या परदेश दौऱ्यात सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्ष देखील सहभागी झाल्यामुळे विरोधकांबाबत देखील अपेक्षाभंग झाला आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दीड वर्षांत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मनपाच्या खर्चाने देश परदेशात अनेक दौरे करुन पर्यटनाचा आनंद उपभोगला. त्यापैकी एकाही दौऱ्याचा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. बार्सिलोना दौऱ्यातील अहवाल आणि यापुढे महापालिकेचे लोकप्रतिनिधी व अधिकारी नागरिकांच्या पैशाने देश-परदेशात दौऱ्यावर गेले, तर त्या दौऱ्याची फलनिष्पत्ती काय झाली याचा सविस्तर अहवाल मांडण्याची मागणी साठे यांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा