दौण्ड-मनमाडमार्गे वळविल्या तब्बल 25 रेल्वे गाड्या

नगर – नागपूर-मुंबई दुरोन्तो एक्‍सप्रेसला कसारा घाट येथे झालेला अपघात तसेच मुंबईतील अति पावसामुळे तब्बल 25 रेल्वे गाड्या दौण्ड-मनमाड मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. नाशिक, इगतपुरीहून जाणाऱ्या या गाड्यांसाठी मंगळवारपासून (दि.29) हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. प्रवाशांची आबाळ झाल्याने खाण्याच्या वस्तूंसाठी एकच धांदल उडत असल्याचे चित्र नगर रेल्वे स्थानकावर पहावयास मिळत आहे.

दुरोन्तो एक्‍सप्रेसला मंगळवारी (दि.29) असणगाव येथे अपघात घडला. कसारा घाटात पावसामुळे दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतातून नाशिक, इगतपुरीमार्गे कल्याण तसेच मुंबईला जाणाऱ्या गाड्या मंगळवारपासून (दि.29) दौण्ड-मनमाड रेल्वे मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्या मनमाड, नगर, दौण्ड, पुणेमार्गे सोडल्या जात आहेत. बुधवारीदेखील हीच स्थिती कायम होती.
एकेरी मार्ग असल्याने दौण्ड-मनमाड मार्गावर नेहमीच्याच गाड्या संथ गतीने धावत असताना तब्बल 25 जादा गाड्यांची त्यात भर पडली आहे. गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाची पुरती दमछाक झाली आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे.

प्रवाशांना नाशिक, इगतपुरीमार्गे ऐरवी कल्याण तसेच मुंबईला जाण्याकरिता चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र गाड्या वळविण्यात आल्याने दहा ते बारा तास अधिकचा खर्च होत आहे. दौण्ड-मनमाड मार्ग जाम झाल्याचे चित्र आहे. नगर रेल्वे स्थानकावर फेरफटका मारला असता खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी प्रवाशांची कॅंटिनवर एकच गर्दी उसळत असल्याचे पहावयास मिळाले. त्याचा मोठा ताण पडत आहे. प्रवाशांना सुविधा पुरविणे कठिण झाल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, गुरूवारीदेखील परिस्थिती सामान्य होणार नसल्याने रेल्वे मार्गावरील जाम कायम राहणार आहे. त्यामुळे नगरसह जिल्ह्यातील प्रवाशांनी गाड्यांच्या वेळा पत्रकांची अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कसारा घाटातील अपघातामुळे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. आणखी काही काळ प्रवाशांना त्रास होईल. मात्र, रेल्वे प्रशासन सतर्क असून सुविधा पुरविण्यावर लक्ष देत आहे. हरजितसिंग वधवा, अध्यक्ष, रेल्वे सल्लागार समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)