दौंड तालुक्‍यात बाजारभावाची रडकथा

पिकांनी तारले अन्‌ दरात मारले

देऊळगांवराजे- दौंड तालुक्‍यातील पिकांनी तारले आणि बाजारभावाने मारले, अशी विचित्र कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे. यंदा थंडीमुळे रब्बी हंगामातील पिके तरारली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांदा, गहु, कोथंबीर, मेथी आदी पिकांना थंड वातावरणाचा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल, याची आस लागून राहिली आहे. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता शेतकऱ्यांना शेतीमाल कवडीमोल दराने विकावा लागणार आहे. गतवर्षी वखारीत ठेवलेला कांदा सडून गेला आहे. जुना कांदा मार्केटलमध्ये विक्रीसाठी आणू नका, असे व्यापारी सांगत आहेत. नवीन कांदा दोन ते पाच रुपये प्रति किलो विकला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही दुरापास्त झाला आहे. कोथंबीर – मेथीची परिस्थिती काही वेगळी नाही. एक एकर कोथंबीर आणि मेथीसाठी एकूण उत्पादन खर्च अंदाजे पंधरा हजार रुपये खर्च येतो. पण कोथंबीर, मेथी कवडीमोल भावाने विकली जात आहे. सध्या 100 ते 300 रुपये शेकडा दराने विकली जात आहे. त्यामुळे काढणीचा खर्चही भागत नाही.
ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु सध्या 20 रुपये प्रति लीटर दर देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. उन्हाळ्यामुळे हिरवा चारा गुरांना मिळत नाही. त्यामुळे पशूधनाचा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लीटर अनुदान देण्याचे ठरलेले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दूध उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत. दुष्काळात एकीकडे शेतकरी होरपळून निघालेला आहे. तर दुसरीकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहिर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेत प्रति वर्ष 6 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यात अनेक जाचक अटी लादल्या आहेत. सध्या दौंड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे.

  • रब्बी हंगामातील दराची चिंता
    दौंड तालुक्‍यात रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. त्यात गहू, हरभरा, कांदा ही पिके थंडीसाठी पोषक आहेत. मात्र, काढणीला येण्यापूर्वीच दरात चढउतार होत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गव्हाचे पिके जोमात आले आहे. काढणीपूर्वी चढा दर असलेला गहू काढणीनंतर भावात घटला जातो. त्यामुळे गव्हाच्या बाजारभावाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)