दौंड तालुक्‍यातील दोन नेत्यांत सत्कारावरून कलगीतुरा

देऊळगावराजे- दौंड तालुक्‍यामध्ये सध्या तालुक्‍यातील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सत्काराचे टीकात्मक नाट्य रंगले असून त्यामुळे कार्यकर्त्यांचे मात्र मनोरंजनच होत आहे.
दौंड तालुक्‍यामध्ये अनेक प्रश्न “आ’ वासून उभे आहेत. भीमा पाटस कारखान्याची झालेली दुर्दशा, कामगारांचे थकलेले पगार, ऊस उत्पादकांची झालेली ससेहोलपट, पाण्यावाचून तळमळलेला देऊळगावराजे, वडगावदरेकर पेडगाव या गावातील शेतकरी, त्याचबरोबर तालुक्‍यातील वाढती बेरोजगारी, दौंड शहराची झालेली दुर्दशा, डेंग्यूच्या रोगामुळे झालेली अडचण यांसह अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत; परंतु तालुक्‍यातील प्रमुख दोन नेते मात्र एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. एकमेकांवर टीका करण्यासाठी क्षणाचीही उसंत न घेणारे नेते मात्र कर्तव्य असूनही देऊळगावराजे, वडगावदरेकर आलेगाव, पेडगावला भेट देण्याचे सौजन्य दाखवू शकले नाहीत, हे मोठे दुर्भाग्य आहे.
गेल्या वर्षी देखील या भागातील शेतकऱ्यांना पाणी संकटाला सामोरे जावे लागले होते आणि यंदा भरपूर पाऊस पडून धरणे शंभर टक्के भरूनही जर या भागातील शेतकऱ्यांवर निराशेची वेळ येत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? सलग दोन वर्ष पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या मुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भविष्यात विश्‍वास ठेवून आपलं घर उपाशी ठेवून निष्ठा दाखवणार, हे येणाऱ्या विधानसभतच समजेल; परंतु तोपर्यंत मोफत सुरू असलेल्या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यातच धन्यता मानावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)