दौंड तालुक्‍याचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार

सुप्रिया सुळे ः पाटस येथील आभार मेळावा उत्साहात

वरवंड, दि. 29 (वार्ताहर) – जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना पाणी पुरवठ्याच नियोजन उत्तम असायचे; परंतु सध्याच्या सरकारच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, यामुळे नागरिकांना पाणीटंचाई आणि पाण्यासंबंधीच्या इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सिंचन भवन येथे बैठकीचे आयोजन केले असून, दौंड तालुक्‍यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पाटस (ता. दौंड) येथील आभार मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष वैशाली नागवडे, दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या आशा शितोळे, नितीन दोरगे, सत्वशील शितोळे, रंगनाथ फुलारी, शिवाजी ढमाले, दिलीप हंडाळ, राहुल आव्हाड, झाकीर तांबोळी, संपत भागवत, विकास खळदकर, अनिल शितोळे पाटील, लहू खाडे, शहाजी भागवत यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांच्या काळात जेवढी विकासकामे केली आहेत त्याच्या दुप्पट ते पाच पट विकासकामे या पाच वर्षांत करणार येणार आहेत. सद्यःस्थितीला राज्यात दुष्काळी स्थिती आहे, यामुळे सर्वांचा सत्कार पाऊस पडल्यानंतर करण्यात येणार आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू असून कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त निवडणुकीपुरता केला जाणार नाही, तर पाच वर्षे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी प्रास्ताविक करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दौंड तालुक्‍यातील कुसेगाव, पडवी, रोटी, हिंगणिगाडा, वासुंदे आणि इतर गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी वैशाली नागवडे, सोहेल खान, महेश भागवत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शितोळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)