दौंड जंक्‍शनच्या “बायपास’ कामाला वेग

मध्य रेल्वेचा महत्वाचा प्रकल्प : पुणे शहराकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या वेळेत धावणार

दौंड- दौंड रेल्वेस्थानकालगत वळण रुळ (बायपास) टाकण्याचा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने घेतलेला निर्णय एक महत्त्वाचा प्रकल्प ठरत असून केंद्रीय रेल्वे मंडळानेही या प्रकल्पाची दखल घेत 2019 अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दौंडच्या या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाबाबत वर्क कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र उगले यांनी सांगितले की, या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत विविध कामे मार्गी लावण्यात येणार असून वळण रूळाचा मार्ग चार किमी असणार आहे. याकरिता 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या टप्यातील निधी उपलब्ध झाल्यानुसार काम सुरू झाले आहे.

या वळण रूळाचे काम झाल्यानंतर पुणे स्टेशनवरून मनमाडकडे जाणाऱ्या गाड्यांना आणि मनमाड येथून पुणे शहराकडे येणाऱ्या गाड्यांना दौंड स्थानकावर थांबून पुढील मार्ग मोकळे होण्याची वाट आता पाहावी लागणार नाही. तसेच, इंजिनची दिशा बदलण्याचीही गरज लागणार नसल्याने या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुमारे एक ते दीड तास वाचणार आहे.

मनमाड येथून पुणे शहराकडे येताना-जाताना दौंड जंक्‍शन लागते. रेल्वे सोलापूरला येत असल्यास इंजिनची दिशा बदलावी लागत नाही. मात्र, गाडी पुण्याला अथवा मनमाडला जाणार असल्यास गाडीच्या इंजिनची दिशा सध्या बदलावी लागते, याकरिता दौंड येथे एक ते दिड तास गाडी थांबवावी लागते. या मार्गावरून रोज किमान 100 गाड्या धावतात. इंजिनची दिशा बदलावी लागत असल्याने अनेक गाड्यांना गरज नसतानाही दौंड स्थानकावर थांबावे लागते. दौंड स्थानकावर वळण रूळ (बायपास) तयार होत असल्याने आता इंजिनाची दिशा बदलावी लागणार नाही, यामुळे इतर गाड्यांनाही स्टेशनवरील रूळ रिकामे सापडून अन्य गाड्याही वेळेत धावू शकतील, असेही सांगण्यात आले.

 • वळण रूळाचे फायदे काय…
  दौंड जंक्‍शन असूनही रेल्वे मार्ग मोकळा मिळणार.
  वळण मार्गावरून मेल एक्‍स्प्रेससह सरळ पुढे निघतील.
  गाड्या स्टेशनवर थांबून राहणार नाहीत.
  दौंड रेल्वे जंक्‍शनवर थांबणे आवश्‍यक आहे, त्याच गाड्या थांबतील.
 • दौंड स्टेशनवरील वळण रूळाचा कामास डिसेंबर 2018 मध्ये सुरूवात झाली असून रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली हे काम वेगाने सुरू आहे. आगामी दोन महिन्यांत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. तरीही डिसेंबर अखेरपर्यंत सर्व काम पूर्ण झालेले असेल.
  – राजेंद्र उगले, व्यवस्थापक, वर्क कंपनी, दौंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)