दौंडमध्ये 42 ग्राहकांची पकडली वीजचोरी

  • 52 हजार 785 युनिटची केली चोरी : दीड महिन्यात 52 वीजचोरी उघडकीस, अभियंता मिलिंद डोंबाळे यांची माहिती

दौंड – दौंड शहराच्या विविध भागांमध्ये वीजमीटरमध्ये फेरफार करून 42 ग्राहकांनी 52 हजार 765 युनिटची वीजचोरी केली आहे. महावितरणच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत दीड महिन्यात 52 वीजचोरी उघड झाल्याची माहिती महावितरणचे दौंड उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांनी दिली.
दौंड शहर व परिसरातील भवानीनगर, दत्तनगर, पासलकर वस्ती, बंगलासाईड व दौंड गोपाळवाडी रस्ता परिसरात महावितरणच्या विशेष पथकाने नुकतेच मीटर तपासणी केली. त्यात ही वीजचोरी उघड झाली. वीजमीटरच्या मागे छोटे छीद्र पाडून फेरफार करण्यासह मीटरला जोडलेली तार तोडून चोरी केली जात होती. या कारवाईत 52 हजार 765 युनिटची चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून सुमारे साडेसात लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची चोरी झाली आहे, अशी माहिती दौंड महावितरण शाखा अभियंता संदीप रणदिवे यांनी दिली. या वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अशा पद्धतीने महावितरणने केलेल्या कारवाईचे स्वागत शहरातून होत आहे. कारण या वीज चोरीचा फटका हा नियमित व प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांना बसत होता. अशी कारवाई सातत्याने केल्यास वीज चोरी होणार नाही, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)