दोन हजार रुपयांसाठी तरुणाच्या डोक्‍यात ब्लॉक घालून खून

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.29- संगमवाडी परिसरात एका युवकाची डोक्‍यात सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बॉम्बे सॅपर्स परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. अवघ्या दोन हजार रुपयांच्या उधारीतून झालेल्या वादात ही घटना घडली.

नरसिंग कुमार गर्ग (वय 38 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील रहिवासी आहे. तर याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दुर्गेश गोस्वामीला (वय 29 वर्ष) अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही एकत्र सुतारकामाचा व्यवसाय करतात. या कामाचे दोन हजार रुपये गर्ग याने गोस्वामी याला द्यायचे होते. पण वारंवार मागणी करुनही तो पैसे देत नव्हता. गोस्वामी याने रविवारी पुन्हा त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने गोस्वामीला लोहगावहून बुधवार पेठेत बोलावून घेतले. तेथे पैशांची देवाण-घेवाण झाल्यावर दोघेही दारू प्यायले. यानंतर गर्ग याच्या दुचाकीवरुन दोघे लोहगाव येथे चालले होते. दरम्यान, संगमवाडी येथे गर्गने लघुशंकेसाठी दुचाकी थांबवली. तेथे त्यांच्यात पुन्हा पैशांवरुन वाद झाला. गोस्वामी याने “आणखी एक हजार रुपये दे,’ असे त्याला सांगितले. यावेळी गोस्वामीने गर्गला लाथ घालून खाली पाडले. यानंतर जमिनीवर पडलेला सिमेंट ब्लॉक त्याच्या डोक्‍यात घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने गर्गचा जागीच मृत्यू झाला. यानंतर गोस्वामी लोहगाव येथे त्याच्या राहत्या घरी निघून आला. दरम्यान, संगमवाडी येथे एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृताची ओळख पटताच तातडीने गोस्वामीचा शोध घेतला. गोस्वामीला घरातच पकडण्यात आले. त्याच्याकडून गर्गचे पाकीट, मोबाइल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)