दोन शेतमजुरांचा वीज पडून मृत्यू

शेवगाव –आखेगाव येथे वीज पडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. जनार्दन दामोधर खर्चन (वय 60) व दादासाहेब चंद्रभान पायघन (वय 53) अशी त्यांची नावे आहेत.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आकाश काळवंडून आले. वादळ वारा सुटला. काही भागात विजेच्या गडगडाटासह कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी झाल्या. चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. जनार्दन खर्चन व दादासाहेब पायघन हे दोघे रवींद्र भागवत यांच्या गट नं. 67 मध्ये पाळी घालीत होते. पाऊस सुरू झाल्याने त्यांनी लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला; मात्र याचदरम्यान विजेचा कडकडाट होऊन ती लिंबाच्या झाडावर पडली. त्यातच या दोघांचा मृत्यू झाला. विजेच्या गडगडाटाने बैलही सैरभैर झाले. ते औतासह शेतातून शेवगाव रस्त्यावर आले. तेव्हा हे शेतमजूर कोठे आहेत, याची काही ग्रामस्थांनी चौकशी केली. झाडाखाली कपडे व केस जळालेल्या अवस्थेत असलेले त्यांचे मृतदेह आढळून आले. महसूल विभागाने या घटनेची तातडीने दखल घेतली. नायब तहसीलदार मयुर बेरड, मंडलाधिकारी अनिल बडे, तलाठी कृणाल गोंधळी व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगावला पाठवून दिले. या घटनेने आखेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)