दोन शिक्षिकांचा आत्मदहनाचा इशारा

पिंपरी – न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना ते डावलून शाळेवर प्रशासक नियुक्ती करत आर्थिक व मानसिक कोंडी केल्याचा आरोप करत अनुदानित शाळेतील दोन शिक्षिकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तत्कालीन शिक्षण संचालक तसेच विद्यमान शिक्षण अधिकारी व प्रशासनावर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून कारवाईची मागणी केली आहे.

या दोन शिक्षिका शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्या मंदिर येथे कार्यरत आहेत. तत्कालीन शिक्षण संचालकांनी शासनाचा अध्यादेश डावलून अनधिकृत संघटनेच्या दबावाला बळी पडून शाळेवर प्रशासक नियुक्तीची शिफारस केली. याविरोधात शिक्षण संस्थेने न्यायालयात अपील केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला 1 सप्टेंबर 2017 रोजी स्थगिती दिली आहे. मात्र, विद्यमान प्राथमिक संचालक सुनील चौहान यांनी प्रधान सचिव यांना न्यायालयीन आदेशाबाबत अंधारात ठेवून 12 मार्च 2018 रोजी प्रशासक नियुक्तीची शिफारस केली. मात्र, प्रधान सचिवांकडून कोणत्याही हलचाली न झाल्याने सुनील चौहान यांनी पुन्हा 28 मार्च 2018 रोजी प्रधान सचिवांना प्रशासक नियुक्तीची शिफारस केली.

प्रधान सचिवांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर काढलेल्या आदेशानुसार सुनील चौहान यांनी 4 एप्रिल 2018 रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांना शाळा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. शाळेच्या प्रशासकीय कामाचा खोळंबा झाला असून शिक्षकांचे मागील सात महिन्यांपासून वेतन थकले आहे. याबाबत शिक्षण प्रशासन विभागात दाद मागूनही न्याय मिळत नाही. शाळेतील काही निलंबित शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करुन शासनाची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आमच्या शिक्षण संस्थेने केली होती. शिक्षण विभागाविरोधात न्यायालयात संस्थेने दाखल केलेले सात अपिल प्रलंबित आहेत. बेकायदा शिक्षक भरतीविरोधात संस्थेने दाद मागितली होती. त्याच्या आकसापोटी आमचा मानसिक व आर्थिक छळ केला जात असल्याचा आरोप या शिक्षिकांनी केला आहे.

अधिकाऱ्यांकडून आमचा होत असलेला छळ थांबवावा, सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला मुख्याध्यापक पदाचे स्वाक्षरीचे अधिकार प्रदान करावेत. ऑक्‍टोबर 2017 ते एप्रिल 2018 पर्यंतचे थकीच वेतन अदा करण्यात यावे. अपुऱ्या कागदपत्राच्या आधारे निलंबित शिक्षकांच्या दबावाला बळी पडून काढलेले अहवाल व आदेश रद्द करावेत. 10 वर्षे ठाण मांडून बसलेल्या शिक्षण मंडळातील लिपिकाची बदली करावी, अन्यथा शिक्षण मंडळ कार्यालय अथवा पुणे जिल्हा परिषद वेतन अधिक्षक कार्यालयात आत्मदहन करु, असा इशारा या शिक्षिकांनी दिला आहे.

आर्थिक, मानसिक छळ केला असे त्या शिक्षिकांचे म्हणणे आहे. त्यांनी काय छळ केला हे स्पष्ट सांगावे. शाळेच्याच काही शिक्षकांनी तक्रारी केल्याने शाळेवर प्रशासक नेमला आहे. संबंधित शाळेवर प्रशासक नेमण्याचा सर्वस्वी निर्णय आणि अधिकार शिक्षण संचालकांचा आहे. त्यामुळे आपल्यावर अधिकार करणे चुकीचे आहे. प्रशासकांनी आदेश दिल्यास आम्ही स्वाक्षरीचे अधिकार संबंधित शिक्षिकांना देवू शकतो. त्यासाठी आम्ही प्रशासकांना पत्र देखील दिले आहे.
बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)