दोन वर्षीय बालिकेने गिळलेला मणी काढण्यात यश

ससून रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया : मण्याला छिद्र होते म्हणून ती वाचली..

पुणे, दि.7 – एका दोन वर्षाच्या चिमुरडीने माळेतला मणी गिळल्याने तिच्या जीवनमरणाचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र मण्याला असलेले छिद्र व डॉक्‍टरांच्या प्रयत्नांमुळे अखेर तो मणी काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. ससून सर्वोपचार रुग्णालयात अलिकडेच अशा प्रकारची घटना समोर आली. त्यानंतर त्या चिमुरडीवर यशस्वीरित्या उपचारही झाले.
आई-वडिल अशिक्षित, भात खाताना ठसका लागला म्हणून एका दोन वर्षीय मुलीला साधारण महिनाभरापुर्वी तिच्या आई-वडिलांनी ससून रुग्णालयात आणले. त्यावेळी तिला श्‍वास घेण्यासाठी त्रास होत होता. नाक, कान, घसा आदीविषयक तिच्या तपासण्या झाल्या. त्यानंतर डॉ. शेफाली पवार यांनी तिचे सिटी स्कॅन करून घेण्यास सांगितले. त्यानुसार त्या मुलीचे सिटी स्कॅनचा अहवाल आल्यानंतर तिने एक मणी गिळल्याचे समोर आले. हा मणी नारळाच्या आकाराचा परंतु लहान असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. तो मणी दारावरचे तोरण किंवा माळेतला असावा. मात्र हा मणी आहे हे समजताच रात्री उशीरा त्या मुलीची ब्रान्चोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अद्ययावत यंत्रांची मदत घेत तो मणी काढण्यात आला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. यामध्ये रुग्णालयातील डॉ. माया जामकर, डॉ. शेफाली पवार, डॉ. प्राजक्‍ता आदींनी प्रयत्न केल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

मण्याला छिद्र असल्याने मुलगी श्‍वास घेऊ शकत होती. हा मणी स्वरयंत्राच्या खाली श्‍वासनलिकेत अडकला होता. हा मणी असल्याचे तो चिमटीत येणे अवघड होते. मात्र अखेर शस्त्रक्रियेनंतर मुलीचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले.
– डॉ.समीर जोशी, कान, नाक, घसा विभागप्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)