अग्निशमन दलाची सर्व वाहने, मनुष्यबळ बचावकार्यात
– गणेश राख
पुणे – आत जाण्यासाठी अरुंद मार्ग…लोकांची गर्दी आणि आगीने धारण केलेले उग्र रुप…यामुळे अग्निशमन विभागासमोरही आव्हान उभे ठाकले. आगीचे तीव्र प्रमाण पाहता अग्निशमन विभागाला “ब्रिगेड’ कॉल करावा लागला. यामुळे शहरातील सर्वच्या सर्व गाड्या, मनुष्यबळांना घटनास्थळी दाखल होऊन कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाटील इस्टेट परिसरात लागलेल्या आगीची तीव्रता मोठी होती. यामुळे जादा गाड्यांची आवश्यकता लागणार असल्याने अग्निशमन विभागाकडून “ब्रिगेड’ कॉल करण्यात आला. आगीची भीषण परिस्थिती असल्यावर अपवादात हा कॉल करण्यात येतो. हा कॉल आल्यानंतर सर्व फायरवाहने आणि मनुष्यबळांनी घटनास्थळी धाव घेण्याची सूचना करण्यात येते. याचमुळे आगीची तीव्रता पाहता बुधवारी कॉल केल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. यावेळी आगीवर नियंत्रणासाठी शहराबरोबरच पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, खडकी बोर्डातील अग्निशननच्या बंबांची मदत घेण्यात आली.
अग्निशमन विभागाला माहिती मिळताच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरुप पाहता जवानांनी तत्काळ पाणी फवारणी सुरू केली. मात्र, आगीचे प्रमाण एवढे होते, की काही वेळातच घरे जळून खाक झाली. तरीही, न थकता मदतकार्य सुुरू ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात पाण्याची कमतरता भासल्याने खासगी वाहनांतूनही पाणी मागवून आग विझविण्याचे काम करण्यात आले. अखेर काही तासानंतर आग आटोक्यात आल्याने जवांनांनीही सुटकेचा श्वास सोडला.
बुधवारी लागलेल्या आगीची तीव्रता मोठी होती. यामुळे घरे, वस्तू आणि नागरिकांना वाचविण्यासाठी अग्निशमनकडून “ब्रिगेड’ कॉल करण्यात आला. साधारण दोन वर्षांपूर्वी मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी याठिकाणी अशा प्रकारची मोठी आग लागली होती. यावेळी ब्रिगेड कॉल करण्यात आला होता
– प्रशांत रणपिसे, अग्निशमन विभाग प्रमुख
ब्रिगेड कॉल म्हणजे काय?
– अपवादात केला जाणार कॉल
– सर्व अग्निशमन वाहने एकाच ठिकाणी
– अग्निशमन विभागातील ऑन ड्यूटी मनुष्यबळ एकाच ठिकाणी
– इतर कार्ये सोडून घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना
– इतर अग्निशमन विभागांची मदत
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा