दोन वर्षानंतर “आयटी हब’ची गाडी रुळावर

हिंजवडी – सदस्यांची अपात्रतेच्या ग्रहणातून मुक्‍तता झाल्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायतच्या कारभारास पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षे प्रशासकांच्या अंमलाखाली असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जोरदार पुनरागमन करत पहिल्याच मासिक सभेत सात कोटी रक्‍कमेच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे. कित्येक नाट्यमय वळणानंतर आता कुठे हिंजवडी ग्रामपंचायतीची गाडी रुळावर आली आहे.

गायरानात अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायतच्या एकूण 17 पैकी 8 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर न्यायालयीन लढा सुरू झाला. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या लढाईत 8 जागांवर पोटनिवडणुकीच्या तोंडावरच यश मिळाल्याने 5 जागा पुनर्गठित झाल्या व उर्वरीत 3 जागांवर पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीसाठी “ईव्हीएम’ही तयार झाल्या असताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने प्रशासकीय यंत्रणेला 5 जागांची पोटनिवडणूक रद्द करावी लागली. त्यामुळे मोठ्या नाट्यमय घडामोडीत हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांचे पुनरागमन झाले.

सदस्यत्व अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्य जयमाला हुलावळे, सागर साखरे, राहुल जांभुळकर, रेखा साखरे आणि श्रीकांत जाधव यांनी हा लढा जिंकला. उर्वरित तीन जागांवर पोटनिवडणुक होवून तानाजी साखरे, आरती जांभुळकर व आशा हुलावळे हे तिघेजण नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे पहिल्याच मासिक सभेत हिरीरीने सहभाग घेत गावाच्या दृष्टीने विकासात्मक पाऊल उचलत गजबलेल्या सभागृहात कोट्यवधींची विकासकामे मंजूर करण्यात आली.

विकासकामांना बसलेली खीळ मोडण्यात ग्रामदैवत म्हातोबाने कौल दिला असल्याची भावना व्यक्‍त करत आणि ग्रामदैवत म्हातोबाच्या नावाने चांगभलं करत म्हातोबा देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी एक कोटी इतक्‍या खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सागर साखरे यांनी दिली. हिंजवडीच्या स्मार्ट विकासाबरोबर पारंपारिक परंपरेला जोपासण्याचा व हिंजवडीच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्नही सर्व पदाधिकारी मनापासून करणार असल्याचेही साखरे यावेळी म्हणाले.

ही विकास कामे होणार…
1) प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्र. 3 व 4 “स्मार्ट प्रभाग’
2) अंतर्गत रस्ते, पाईप लाईन, ड्रेनेज, पथदिवे, पाणी या सुविधा
3) कचरामुक्त वॉर्डचे लक्ष्य
4) महिलांसाठी बहुउद्देशीय अस्मिता भवन, तरुणांसाठी व्यायामशाळा
5) नाना-नानी पार्क संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न
6) पाणंद रस्ते खुले करणार
7) म्हातोबा देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपये


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)