शिकागो – येथे सुरू असलेल्या जागतिक हिंदु कॉंग्रेस अधिवेशनात निदर्शकांच्या एका छोट्या गटाने केलेल्या घोषणाबाजी मुळे काही काळ या अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आला. भारतात अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तेथे ही घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराच्या संबंधात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. साऊथ एशियन फॉर जस्टीस या संघटनेच्या या कार्यकर्त्या होत्या.

भारतात अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही निदर्शने केल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही महिला कार्यकर्त्यांची नंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या निदर्शनांचे कारण सांगितले.

या दोघींनी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे अधिवेशन स्थळी प्रवेश मिळवला. त्यांनी ज्यावेळी ही निदर्शने केली त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे आणखी एक महत्वाचे पदाधिकारी दत्तात्रय होसबाळे आणि अन्य सहा हिंदु नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

संघाच्या प्रतिनिधींनी येथून निघून जावे, हिंदु फॅसिझम थांबवा अशा घोषणा देत या दोन महिला निदर्शकांनी तेथे व्यत्यय आणला. उपस्थित काही प्रतिनिधींनी संघाच्या समर्थनार्थ घोषणा देऊन त्यांना विरोध केला. नंतर त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)