दोन पीएमपी बसची धडक; 9 जखमी

ब्रेक फेल झाल्याने अपघात : प्रशासनाने दावा फेटाळला
– सातारा रस्त्यावर पंचमी हॉटेलजवळील घटना

प्रभात वृत्तसेवा

पुणे – पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्याने दुसऱ्या बसवर धडकून अपघात झाल्याची घटना सोमवारी पुणे-सातारा रस्त्यावर घडली. या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले. पीएमपी प्रशासनाने मात्र ब्रेक फेल झाल्याचा दावा फेटाळत पुढच्या बसने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाल्याचे सांगितले. ऐनवर्दळीच्या वेळी झालेल्या या अपघाता कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेमुळे पीएमपी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी बाद झालेल्या बसही रस्त्यावर काढल्या जात आहे.

स्वारगेटवरुन कात्रजच्या दिशेने जाताना पंचमी हॉटेलजवळ दुपारच्या वेळेस हा अपघात झाला. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड समता नगर (बस क्रमांक 24) ही बस साईबाबा मंदिराजवळ आली असताना त्यापुढे आणखी एक पीएमपी बस होती. ही बस पुढील बसवर जोरात धडकून शेजारच्या डिव्हायडरवर चढून थांबली. या अपघाताने बसमधील प्रवाशांना मार लागला. यातील काही जखमी स्वत:हून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पीएमपीप्रशासनाचा तपासणीस आणी इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांची तक्रार घेण्यासाठी कर्मचारी दाखल झाले होते. मात्र तो पर्यंत जखमी प्रवाशी स्वत:हून रुग्णालयात गेल्याने जखमी प्रवाशांचा आकडा प्रशासनाला मिळू शकला नाही.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अपघाताच्या ठिकाणी पोहचले होते. मात्र दुपारी उशीरापर्यंत ते अपघाताचा पंचनामा करत होते. सायंकाळी सातवाजेपर्यंत पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराला घटनेची कोणतीच माहिती नव्हती. तसेच घटनास्थळी गेलेल्या अधिकाऱ्याचे नावही माहिती नव्हते. अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस ठाण्यातून रात्री उशिरापर्यंत सांगण्यात येत होते.

जखमींचा आकडा कळेना
पीएमपीची मार्ग क्रमांक 24 या बसला पंचमी हॉटेलजवळ अपघात झाला. पुढच्या खासगी मालकीच्या पीएमपी बसने अचानक ब्रेक दाबल्याने ही बस त्या बसला धडकली. दरम्यान चालकाने स्वत:हून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. जखमी प्रवाशी अपघातानंतर निघून गेल्याने जखमींचा आकडा कळू शकला नसल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिली.

पीएमपी बसचे मेंटेंनन्स व्यवस्थित होणे आवश्‍यक आहे. बसचा अचानक ब्रेक फेल होऊन अपघात घडत असतील, तर याला मेटेनन्स विभागाबरोबरच चालकही जबाबदार आहे. चालकाने बस बाहेर काढताना सर्व बाबी तपासणे आवश्‍यक आहे. यामुळे अपघातास मेंटेनन्स विभाग आणि चालक दोघांनाही जबाबदार धरले पाहिजे
– विवेक वेलणकर, सामाजीक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)