दोन पिढ्यांमधली वाढती दरी अधोरेखित करणारा ‘राजमा चावलं’

एका बाजूला ऑनलाईनचे प्रचंड वेड असणारी ‘न्यू जनरेशन’ तर दुसरीकडे ‘ऑनलाईन’ जगाबाबत पूर्णपणे अज्ञानात असलेली ‘ओल्ड जनरेशन’ असे कॉम्बिनेशन आजकाल आपल्या सभोवताली पाहायला मिळतं. कानामध्ये सतत हेडफोन्स घालून आपल्याच दुनियेमध्ये राहणारा मुलगा आणि आपल्या मुलाने आपल्याशी संवाद साधावा यासाठी झगडणारे त्याचे वडील अशी हल्ली प्रत्येक घरामध्ये ‘कॉमन’ झालेली दास्तान ‘राजमा चावलं’मध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

आपल्या मुलाने बोलतं व्हावं यासाठी त्याचे रिटायर्ड वडील राज माथूर अर्थात ऋषी कपूर अनेक क्‍लुप्त्या आजमावून पाहतात. आपले नव्या दिल्लीतील घर सोडून जुन्या दिल्लीमध्ये शिफ्ट होण्यापासून ते जुन्या घरातील टॉयलेटमध्ये कमोड लावण्यापर्यंतचे सर्व उपाय करून देखील मुलगा कबीर काही बोलका होत नसतो. शेवटी हताश झालेले वडील आपल्या पडोसी बीजींना सल्ला मागतात. टेक्‍नोसॅव्ही असलेल्या बीजीदेखील राज माथूर (ऋषी कपूर) यांना “गर बात नई करदा तो कोई गल नई, चाट कर उसके साथ!!” असा मार्मिक सल्ला देतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीजींचा सल्ला मनावर घेऊन राज माथूर देखील आपला जुना डब्बा फोन विकून स्मार्टफोन खरेदी करतात. आपला मुलगा आता आपल्यासोबत ‘चॅट’ करेल अशी भाबडी आशा मनात बाळगून ते आपलं फेसबुक अकाउंट सुरु करतात मात्र येथेही त्यांच्या हाती निराशाच लागते, कबीर आपल्या वडिलांची फ्रेंड रिक्वेस्ट ‘रिजेक्‍ट’ करून टाकतो. कबिरने फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्‍ट केल्याने राज माथूर यांचं हृदय तुटून जाते मात्र त्यांचे दुसरे शेजारी त्यांना एक नवीन आयडिया देतात. आपल्या शेजाऱ्याच्या म्हणण्यावरून राज माथूर आता एका तरुण मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवतात आणि मग सुरु होते खरी ‘कसरत’! कानावर सतत हेडफोन लावून आपल्याच विश्‍वात राहणारा कबीर ‘चॅटिंगच्या’ माध्यमातून का होईना पण बोलका होतो. आई वारल्यानंतर तो कशाप्रकारे आपल्या वडिलांना दोषी मानायला लागतो, त्याच्या मनात वडिलांविषयी असलेला तिरस्कार अशा सगळ्या गोष्टी त्या फेक अकाउंटसोबत चॅट करताना कबीर सांगतो. वडिलांसोबत एक शब्दही न बोलणारा कबीर चॅट करताना मात्र मनमोकळा होऊन जातो. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या अबोल्याचे कारण स्पष्ट होते आणि हळू हळू गुंता सुटत जातो.

केवळ संवादाच्या अभावामुळे कशाप्रकारे दोन पिढ्यांमधली दरी वाढत आहे, याचे उत्तम चित्रण राजमा चावलमध्ये करण्यात आलं आहे.

– श्‍वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)