दोन दिवसांत चार ठिकाणी चोरीचा प्रकार

शिक्रापूर-येथे दुचाकी चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून आता घरे, ऑफिस, दुकाने, पतसंस्था फोडून चोऱ्या करण्याचे प्रमाण दोन दिवसांत वाढत आहे. चोरट्यांनी दोन दिवसात एक पतसंस्था, एक ऑफिस, एक शोरूम फोडले. येथील रक्कम, काही वस्तू व एका बिल्डींगमधील दुचाकी चोरून नेली असल्याची घटना घडली.
शिक्रापूर येथे चाकण चौकात असलेल्या साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेचे कर्मचारी विकास राजेंद्र जामदार (रा. करंदी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेतील कामगार सायंकाळच्या सुमारास पतसंस्था बंद करून घरी गेले होते. घरी जाताना त्यांनी पतसंस्थेतील दोन लाख 92 हजार 280 रुपये रक्कम तिजोरीमध्ये ठेवून कुलूप लावले होते. तर 17 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पतसंस्थेतील कामगार कामावर आले असताना त्यांना शटर तोडलेले दिसले. त्यानंतर आतमध्ये पाहिले असता तिजोरी कापून त्यातील सर्व रक्कम चोरी गेल्याचे समजले. चोरट्यांनी पतसंस्थेबरोबरच शेजारील चोलामंडल फायनान्सच्या ऑफिसचे शटर उचकटून त्या ऑफिस मधील संगणक व इतर वस्तू चोरून नेल्या असल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्रीही चोरट्यांनी बजरंगवाडी येथील थेऊरकर ऑटोमोबाईल्स हे दुचाक्‍यांचे शोरूमचे शटर उचकटून त्यामधील 27 हजार रुपये रक्कम लांबविली. तर या शोरूमच्या पाठीमागे असलेल्या भीमराव सातपुते यांच्या बिल्डींगच्या गेटचे कुलूप तोडून येथे राहणारे पत्रकार सूर्यकांत चंद्रकांत शिर्के यांची (एमएच 12 जेई 2184) दुचाकी चोरून नेली.
शिक्रापूर भागातील एकाच ठिकाणच्या काही अंतरावर दोन दिवसांत चार ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून याबाबत विकास राजेंद्र जामदार (रा. करंदी, ता. शिरूर) तसेच इतरांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व विजय गाले हे करीत आहेत.

  • एक तास तिजोरी कापण्याचे काम सीसीटीव्हीत कैद
    शिक्रापूर येथे साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेचे शटर उचकटून त्यातील दोन लाख 92 हजार 280 रुपये चोरट्यांनी तिजोरी कापून चोरून नेले असल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यावेळी चोरटे निवांत बसून तब्बल एक तास तिजोरी हेक्‍साब्लेडने कापत असल्याचे दिसून येत आहे; परंतु येथे मोठे कॉम्प्लेक्‍स असूनदेखील येथील दुकानदार, व्यावसायिक तसेच बॅंकेकडून कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच थेऊरकर ऑटोमोबाईल्स या शोरूममध्ये देखील चोरी करताना चोरता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)