पिंपरी – दोन वेगवेगळ्या खुनातील चार फरार आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तपास पथकाने बेड्या ठोकल्या.
पहिल्या कारवाईत पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या अक्षय चंद्रकांत भोरे (वय-23), कपिल संजय गायकवाड (वय-22, दोघेही रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत, पिंपरी), सिद्धार्थ उर्फ मामू गणेश यादव (वय-23, रा. बलदेवनगर, साई चौक, पिंपरी) या तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आरोपींनी 13 डिसेंबर 2016 रोजी अशपाक मोहताज शेख या तरुणावर कोयत्याने वार करून खून केला होता. तसेच अशपाक सोबत असलेल्या संतोष बाबुराव वाघमारे आणि रविंद्र विलास गडहीरे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी पोलिसांनी चकवा देत परिसरात दहशत माजवत होते. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी शैलेश सुर्वे आणि आशिष बोटके यांना आरोपी मिलिंदनगर परिसरात फिरत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, सापळा रचून सुरूवातीला अक्षय भोरे याला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवून इतर आरोपींची धरपकड केली. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी शैलेश सुर्वे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शरीफ मुलाणी, आशिष बनकर, किरण काटकर, प्रवीण माने, गणेश कोकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसऱ्या कारवाईमध्ये जेवणाच्या बिलावरुन हॉटेल व्यवस्थापकाला गोळ्या घालून खून करत फरार असलेल्या तुषार जोगदंड याला गुन्हे शाखा एकच्या तपासी पथकाने अटक केली. 21 मे 2014 रोजी माजी नगरसेवक जालिंदर शिंदे व त्याचे मित्र कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर, विशाल टिंगरे यांचा जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मॅनेजर विशाल दत्तोबा शिंदे यांच्याशी वाद झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून जालिंदर शिंदे, कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर, विशाल वसंतराव टिंगरे, साई उर्फ कौशल विश्वकर्मा, बापू उर्फ प्रदीप गाढवे, संतोष उर्फ रुपेश पाटील, राहुल करंजकर, तुषार जोगदंड हे पुन्हा त्या हॉटेलवर गेले व त्यांनी हॉटेल मॅनेजरवर गोळ्या झाडल्या. यातील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तर जोगदंड हा चार वर्षापासून फरार होता. गुन्हे शाखा एकच्या तपासी पथकाला जोगदंड हा देहुरोड येथील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक सचिन अहिवळे, सचिन उगले, प्रवीण पाटील व गणेश सावंत यांनी केली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा