दोन्ही लेकींच्या विरोधात ना.मुंडेंच्या सभांमुळे आ.कर्डिले वैतागले

पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; ना. मुंडेंचा झाला नाईलाच

नगर – महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप पक्षांतर्गत शह कटशहराच्या राजकारणाची एकही संधी नेत्यांकडून सोडण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात विविध ठिकाणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभा झाला. परंतू त्यात दोन सभा ज्या झाल्या त्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही लेकी ज्या प्रभागात उभ्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात झाल्याने पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारामुळे आ. कर्डिले वैतागले आहेत. या कुरघोडीच्या राजकारणाला योग्यवेळी उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे कळते.

महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये सर्वच अलबेल सुरू असल्याचे वरवर दिसत असले तरी पक्षांतर्गत खदखद सुरू आहे. सध्या महापालिका निवडणूक प्रचारात भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. मंत्र्यांसह नेत्यांकडून प्रचार सभांच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढण्यात येत असतांना पक्षांतर्गत जिरवाजिरवीचे राजकारण देखील जोरात सुरू आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शहरात रॅली व प्रचार सभा घेतल्या. त्यात सकाळी 11.30 च्या सुमारास सारसनगरमध्ये ना. मुंडेंची सभा झाली. विशेष म्हणजे या सभेला आ. कर्डिले देखील उपस्थित होते.

सारसनगर या भाग प्रभाग क्रमांक 14 मध्ये येत असून या प्रभागात आ. कर्डिले यांची लेक व आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी ना. मुंडे सभा जरी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ असली तरी तरी आ. कर्डिले यांची लेक शितल जगताप यांच्या विरोधात ही सभा झाली. त्यानंतर सायंकाळी एकविरा चौकात प्रभागात क्रमांक 3, 4, 5 या प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. मुंडे यांची सभा झाली. त्याही सभेला आ. कर्डिले यांना उपस्थित रहावे लागले. अर्थात प्रभाग क्रमांक 4 मध्ये आ. कर्डिले यांची दुसरी लेक ज्योती गाडे या राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभ्या आहेत. तेथेही लेकीच्या विरोधात ना. मुंडे यांची सभा झाली.

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात व भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. मुंडे यांची सभा झाली असली तरी निशाना मात्र आ. कर्डिले यांच्या दोन्ही लेकीच्या विरोधात या सभा झाल्याचे चित्र समोर आले आहे. ना. मुंडे यांच्या सभाचे नियोजन करतांनाच त्या आ. कर्डिले यांच्या दोन्ही लेकीच्या विरोधात सभा होतील अशा पद्धतीने करण्यात आले होते. त्यामुळे आ. कर्डिले वैतागले असल्याचे समजते. या भाजप पक्षांतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या आ. कर्डिले यांच्या लेकींनाच लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून आ. कर्डिले यांनी संबंधितांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ना.मुंडे यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याने त्यांना नाईलाचाने या दोन्ही सभा कराव्या लागल्या. व त्या ठिकाणी प्रतिस्पर्धांवर टिका करून भाजपचा प्रचार करावा लागला आहे. त्याचा फटका राष्ट्रवादी की शिवसेना बसणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
27 :thumbsup:
7 :heart:
8 :joy:
2 :heart_eyes:
9 :blush:
5 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)