दोनशे कोटींची उलाढाल ठप्प

पिंपरी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद’ला पिंपरीतील व्यापाऱ्यांनी सर्व बाजारपेठा बंद ठेवून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. यामुळे, रोजची होणारी सुमारे दोनशे कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याने सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरातील कापड मार्केट, भाजी मंडई, छोटे-मोठे हॉटेल्स, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंदमुळे ओस पडलेली होती. विविध ठिकाणी असलेले स्टेशनरी मार्केट, किराणा भुसार मार्केट, मोबाईल शॉपी, मॉल्स ही मोठी उलाढाल होणारी ठिकाणे आहेत. या ठिकाणी रोज शहरातून खरेदीसाठी नागरिक येतात. मात्र, सर्व बाजारपेठा ठप्प असल्याने आर्थिक व्यवहार झाले नाहीत. यामुळे, बाजारपेठेतील कोणत्याही मालाची विक्री झाली नाही. तसेच, इतर शहरातून आवक-जावक होणारा मालही बंद असल्याचे दिसून आले.

पिंपरी सेंट्रल मार्केटचे सचिव मनोहर जेठवानी म्हणाले,””शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. शहरात सात ते आठ ठिकाणी मोठ-मोठ्या बाजारपेठा आहेत. मात्र, बंदमुळे पेठेत शुकशुकाट होता. सायंकाळच्या सुमारास काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मात्र, बाजारपेठेत ग्राहक नसल्याने आर्थिक उलाढाल झाली नाही. यामुळे, शहरातील बाजारपेठेत रोजची होणारी सुमारे दोनशे कोटीची उलाढाल ठप्प झाली.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)