दोनच वर्षात शाळेच्या भिंतीला तडे

पिंपरी – महापालिकेच्या पवनानगर येथील शाळेच्या इमारतीला तडे गेल्याने विद्यार्थी धोकादायक स्थितीत शिक्षण घेत आहेत. तसेच, पावसाळ्यात वर्गामध्ये पाणी गळती होत असून या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील इमारतीचे बांधकाम 2016 साली पूर्ण करण्यात आले असून ते निकृष्ठ दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, संबंधित बांधकाम करणारा ठेकेदार, अधिकारी यांची माहिती मागवून पुढील कार्यवाही करणार असल्याचे, शिक्षण समितीने सांगितले आहे.

महापालिकेची प्रभाग “ब’ मध्ये पवनानगर येथील इंग्रजी माध्यमाची शाळा असून 286 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. तसेच, शाळेतील खोल्यांचे दरवाजे व चौकटी मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात खोल्यामध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना बसताना अडचणी निर्माण होतात.

-Ads-

या इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु होते. 2013 साली या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) निघाला होता. परंतु, 2016 मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीला तीन कोटीहून अधिक खर्च झाला आहे. कोट्यावधी रुपये खर्चुनही इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या तत्कालिन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

“शाळा भेट उपक्रमा’चा फायदा
महापालिकेने यंदाच्या वर्षी शाळा भेट हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत पवनानगर येथील शाळेला महापौर, शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकारी यांनी भेट दिल्यानंतर शाळेची पाहणी करताना इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले. या शाळेतील इमारात लवकरात-लवकर दुरुस्त करणार असल्याचे, शिक्षण समितीने सांगितले आहे. यामुळे, “शाळा भेट’ या उपक्रमाचा फायदा निश्‍चितपणे विद्यार्थी व शिक्षकांना होत असल्याचे दिसून येत आहे.

पवनानगर येथील शाळेच्या इमारतीची पाहणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केली आहे. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने इमारतीला तडे गेले आहेत. स्थापत्य विभागाला शाळेची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर, येत्या काही दिवसात शहरातील शाळांची पाहणी करताना काही ठिकाणी शाळांची दुरावस्था दिसल्यास तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
– प्रा. सोनाली गव्हाणे, शिक्षण समिती सभापती, महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)